दापोली समुद्रकिनारी वाळूत गाडी रुतण्याच्या प्रकारात वाढ

दापोली : विधानसभा निवडणुकीनंतर दापोलीत पर्यटनामध्ये वाढ होऊ लागली आहे. तालुक्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी चांगलेच गजबजले आहेत. अशा वेळी पर्यटक समुद्र किनारी वाळूवर गाडी चालवत असून, यामुळे दुर्घटना होत आहेत.

दापोलीत समाधानकारक थंडी पडत असल्याने पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे लाखो पर्यटक दापोलीत दाखल होत आहेत. पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाल्यानंतर पर्यटकांना येथील पर्यटनाचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही अशावेळी पर्यटक कोणत्याही प्रकारची योग्य माहिती स्थानिक मंडळींकडून न घेता थेट समुद्र काठावर वाळूत गाडी चालवण्याचा आनंद घेण्यासाठी जातात. मात्र, अनेक वेळा वाहने किनाऱ्यावरील वाळूत अडकतात. कोकणात फिरायला जायचे म्हटले की दापोली किनारपट्टीला पर्यटक आवर्जून भेट देतात. थंड आल्हाददायक वातावरण, शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला दाभोळ ते केळशीपर्यंतचा समुद्रकिनारा यामुळे दापोली तालुक्याला पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वाचे स्थान आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, मुंबई आदि जिल्ह्यातील, परदेशात आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक कोकणातल्या निसर्गाचा आनंद लुटण्या करिता दापोलीत येतात.

दापोलीचा समुद्र किनारा हा कुणालाही पाहता क्षणी भुरळ घालेल, असा आहे. मात्र, पर्यटकांनीदेखील येथील समुद्र किनाऱ्याची आणि येथील पर्यटनाची योग्य माहिती घेतल्यास अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत. त्यामुळे स्थानिकांनादेखील त्याचा मनःस्ताप होणार नाही. – राकेश पालटे लाडघर, दापोली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 27/Nov/2024