कोकणातील कातळशिल्प वारशावर आधारित चित्रकला वही

राजापूर : जागतिक वारसा सप्ताहानिमित्ताने रत्नागिरी येथील कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रातर्फे कोकण परिसरातील सांस्कृतिक वारसा कातळशिल्प आणि नैसर्गिक वारसा ठेव्यावर आधारित चित्रकला वही तयार केली आहे. या वह्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील सोलगाव आणि देवीहसोळ येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रातर्फे भेट देण्यात आल्या.

कोकणातील कातळशिल्प हा अश्मयुगीन काळातील मानवाने मागे सोडलेला एक समृद्ध वारसा ठेवा असून, या कातळशिल्पांचे सर्वांना महत्त्व समजताना त्याचे जतन आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने हा अनोखा उपक्रम अधिक उपयुक्त ठरणार आहे. सोलगाव आणि देवीहसोळ येथे झालेल्या या वह्या वाटप कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कातळशिल्प संशोधक, पक्षी निरीक्षक आणि निसर्गयात्री संस्थेचे अध्यक्ष सुधीर रिसबुड, कातळशिल्प संशोधक धनंजय मराठे. रेणुका जोशी, पुरातत्त्व विभागाचे ऋत्विक आपटे, अजिंक्य प्रभूदेसाई, लक्ष्मण फाटक, दीपक धामापूरकर, शंकर बावदाने, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

निसर्गयात्री संस्थेने केलेल्या संशोधनामध्ये सोलगाव, देवीहसोळ यांसह राजापूर तालुक्यासह अनेक भागांमध्ये कातळशिल्प आढळून आली आहेत. या कातळशिल्पांबाबत माहिती व्हावी, त्याचे महत्त्व अधोरेखित व्हावे, त्यांचे जतन अन् संवर्धन व्हावे. म्हणून जनजागृती करणे आणि त्याबाबत नव्या पिढीला माहिती मिळावी, या उद्देशाने चित्रकला वहीं तयार केली. ती विद्यार्थ्यांना वितरित केली.

अशी आहे
चित्रकला वहीमध्ये चित्र रंगवताना विविधता ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये काही चित्रे दिलेला फोटो पाहून त्यानुसार रंगवायची आहेत, तर काही स्वतःच्या कल्पनेने रंगवायची आहेत. काही चित्रे पाहून काढायची आणि मग रंगवायची असून, एक पान मुलांनी स्वतःच्या कल्पनेने चित्र काढून रंगवायचे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 27/Nov/2024