दापोली : राज्यात अनेक दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. ही निवडणूक ते हरले की हरवले गेले, हा प्रश्नच आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात समोरच्या बलाढ्य उमेदवाराला कडवी झुंज दिली असून, आपण कोठेही कमी पडलेलो नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार संजय कदम यांनी दापोलीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांजवळ चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा जिद्दीने उभे राहण्याच्या उद्देशाने संजय कदम यांनी दापोलीत बैठक घेतली. या वेळी कदम म्हणाले, ‘२०१४ ला मी आमदार झालो त्या वेळी मतदारसंघात अशी कोणतीही हवा नव्हती. २०१९ ला पराभूत झालो त्या वेळीही वातावरण व्यवस्थित होते; मात्र २०२४ ला मी निवडून येईन,’ असे वातावरण असतानाही गावागावात तसा प्रतिसाद असतानाही २४ हजारांचे मताधिक्य समोरच्या उमेदवाराला मिळाले. ते कसे मिळाले, हा प्रश्नच आहे. अनेक गावात समोरच्या उमेदवाराचे मतदार मुंबईतून आले नव्हते. महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. जे झाले ते झाले, आता पुन्हा नव्या दमाने दापोली मतदार संघात काम करत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच गावनिहाय दौरे करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्यांला नव्याने लढण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. जे झाले ते झाले पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागूया आणि पुन्हा एकदा माणुसकीला जिंकवण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:10 PM 27/Nov/2024














