अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी, सुषमा अंधारे म्हणाल्या…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना न्यायालयाने (Court) दोषी ठरवले आहे.

न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले की, या संपूर्ण केसचा अभ्यास केल्याशिवाय किंवा न्यायालयाने नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेतल्याशिवाय यावर भाष्य करणे उचित होणार नाही. यात शिवडी न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवलेले जरी असतील तरी अजून पुढील पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही मुद्दे आपल्याकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यायचे राहिले असतील, युक्तीवादात काही गोष्टी राहिल्या असतील, ज्यामुळे हे काही घडलं असेल त्यामुळे वरिष्ठ न्यायालयात त्रुटींची पूर्तता करत नव्याने हे प्रकरण मांडण्यात येईल आणि पुन्हा दाद मागण्याचा प्रयत्न केला जाईल.

वरच्या कोर्टात दाद मागणार : सुषमा अंधारे

त्यामुळे मला वाटत नाही की, यावर फार काही चिंता करण्याचं कारण आहे. विषय गांभीर्याने नक्की हाताला जाईल. परंतु लगेचच संजय राऊत हे दोषी आहे, असे समजण्याचे काही कारण नाही. कालच्याच रश्मी बर्वे जात प्रमाणपत्र प्रकरणात निवडणूक आयोगाने रडीचा डाव खेळत त्यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. काल कार्यालयाने दणका देत ते योग्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खाली काही जर आमच्याकडून राहिले असतील तर आम्ही वरच्या कोर्टात त्रुटींची पूर्तता करून नव्याने दाद मागू, असे त्यांनी सांगितले.

नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायालयाने संजय राऊत यांना 25 हजारांचा दंड आणि 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 26-09-2024