रत्नागिरी : उत्तरेकडून हिमालय क्षेत्राच्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळं कोरड्या वाऱ्याचा बहुतांशी परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर जाणवू लागला आहे. यामध्ये कोकणही गारठले असून रत्नागिरी जिल्ह्य़ातही गेल्या चार दिवसांपासून हुडहुडी जाणवत आहे. राज्यात हिवाळ्याच्या धर्तीवर हवामान विभागाने थंडीचा यलो अलर्ट महाराष्ट्रात जारी करण्यात आला आहे. मात्र बंगालच्या खाडीत तयार झालेल्य़ा फेंगल चक्रीवादळामुळे या थंडीबरोबर दाट धुक्याचा प्रभाव देखील वाढणार असल्या अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रात पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असतानाच तिथे बंगालच्या उपसागरात चक्रिवादळसदृश वाऱ्याची निर्मिती झालेली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट लागू राहणार आहे. फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर उत्तर आणि मध्य क्षेत्रच थंडीनं व्यापलं आहे. राज्यातील अनेक जिह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्या धुक्याची चादर पांघरलेली पहायला मिळत आहे. सूर्य डोक्यावर आलेला असतानाही हवेतील गारठा मात्र कायम राहू लागला आहे.
मागील काही दिवसांपासून रत्नागिरीत सातत्याने तापमानातील घट झालेली आहे. त्यामुळे इथं थंडीनं पाय घट्ट रोवल्याचं पाहायला मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटय़ा पेटू लागल्या असून उबदार कपडे बाहेर काढण्यात आले आहेत. मागील 48 तासांमध्ये रत्नागिरीतील किमान तापमान 18-19 अंशांवर घसरल्याचे पाहायला मिळालं आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे दिवसाचे तापमान 33 अंश तर रात्रीचे तापमान 19-20 अंशावर गेलेले आहे. सायंकाळनंतर अगदी सकाळपर्यंत घसरलेल्या पाऱ्याने रत्नागिरीकर चांगलेच गारठले आहेत. उत्तरेकडे थंडीचा जबर मारा होत असल्या परिणाम रत्नागिरी जिल्हय़ातही प्रकर्षाने जाणवू लागलेला आहे.
एकंदरच देशाच्या उत्तरेला असणाऱ्या राज्यांमधील गारठा थेट महाराष्ट्रावर परिणाम करत असून, ही थंडीची लाट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहाटेच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक राहणार आहे. तर बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाब क्षेत्रामुळे किनारपट्टी भागांमध्ये सोसाटय़ाचा वारा सुटण्याची शक्यता आहे. तरीही महाराष्ट्रावर मात्र या प्रणालीचा थेट परिणाम होणार नाही, असं असलं तरीही किनारपट्टी भागांमध्ये मात्र यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 30-11-2024














