रत्नागिरीतील तरुणाचा सांगलीत चाकूने भोसकून खून

सांगली : शहरातील सावंत प्लॉट परिसरात एका हॉटेल कामगाराचा चाकूने भोसकून निघृण खून करण्यात आला. शैलेश कृष्णा राऊत (वय २६, मूळ रा. लांजा, रत्नागिरी, सध्या रा. पारिजात कॉलनी, सावंत प्लॉट) असे या कामगाराचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली.

या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने सुमित संतोष मद्रासी (२३, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) आणि सौरभ बाबासाहेब कांबळे (२२, त्रिमूर्ती कॉलनी, सांगली) अशी त्या दोघांची नावे आहे. यासह एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले.

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हे कृत्य झाल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शैलेश राऊत हा सांगलीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. संशयित सुमित मद्रासी, सौरभ कांबळे व अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे मित्र आहेत. संशयित गुरुवारी रात्री शैलेश कामास असलेल्या हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा ते सावंत प्लॉट येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवनशेजारील खुल्या जागेत आले. रात्री नऊच्या सुमारास शैलेश त्या ठिकाणी आला. तेथे ते पुन्हा दारू पित होते. त्यावेळी या चौघांत किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर शैलेश याने त्याच्याकडील चाकू काढला. त्यावेळी तिघांनी त्याच्याकडील चाकू काढून घेतला. तसेच धक्काबुक्की करीत संशयिताने शैलेश याला भोसकले. शैलेश तेथून पळत सुटला आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान, अतिरक्तस्त्रावाने शैलेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांचेही पथक दाखल झाले. यावेळी ठसेतज्ज्ञही दाखल झाले. घटनास्थळी शैलेशची चप्पल व दुचाकी मिळून आली. संशयितांच्या शोधासाठी विश्रामबागसह एलसीबीची टीम रवाना करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार यांच्यासह पथकाला, संशयित धामणी रस्त्यावर लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली. तिघांनीही खुनाची कबुली दिली आहे. तिघांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान शैलेशच्यामागे आई-वडिल, पत्नी असा परिवार असून त्याचे लग्न दोन वर्षांपूर्वीच झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:58 PM 30/Nov/2024