चिपळूण : २९ गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेल्या शहरातील विरेश्वर कॉलनी परिसरातील खुल्या भाजी मंडईच्या कामाला अखेर शुक्रवारपासून सुरुवात झाली. या मंडईमुळे स्थानिक भाजीविक्रेत्यांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या मंडईचा मोठा लाभ होणार आहे. तसेच शहरातील नागरिकांनाही थेट शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करता येणार असल्याने पालिकेच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
येथील महर्षी कर्वे भाजी मंडई इमारतीचा गुंता अद्याप सुटलेला नाही. नव्याने उभारलेल्या या इमारतीतील ५४ गाळे, ५२ ओठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी १० ते १२ वेळा लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली; परंतु शॉपिंग सेंटरमधील गाळे वगळता भाजीविक्रेत्यांसाठी असलेल्या गाळे व ओठ्यांना एकदाही प्रतिसाद मिळालेला नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनी भाजी मंडईच्या मूल्यांकनावर आक्षेप घेतल्यानंतर त्यात फेरबदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याप्रमाणे गाळ्याच्या मूल्यांकनात बदल करून अनामत रक्कम व भाडेकरारात देखील सूट दिली; मात्र त्यानंतरही व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद दिला नाही.
परिणामी, नव्याने उभारलेली इमारत आज १० वर्षांहून अधिक काळ धूळखात पडली आहे. अजूनही काही वर्षे महयों कर्वे भाजी मंडई बहरण्याची शक्यता नाही. त्यामुळे चिपळूण पालिकेने विरेश्वर कॉलनी परिसरात खुल्या भाजी मंडईसाठी आरक्षित असलेल्या जागेत नवी मंडई विकसित करण्यास सुरुवात केली आहे. साधारणतः २४ गुंठे जागेत उभारण्यात येणाऱ्या या खुल्या भाजी मंडईसाठी शुक्रवारपासून कामाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात या जागेत भराव व सपाटीकरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात काँक्रिटीकरणासह अन्य कामांना गती दिली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी हक्काची जागा
सद्यःस्थितीत शहरातील चिंचनाका, जुना बसस्थानक, प्रभातरोड मार्गावर भाजीचे दुकान थाटणाऱ्या ग्रामीण भागातील विक्रेत्यांना हा मोठा पर्याय निर्माण होणार आहे. ग्रामीण व स्थानिक शेतकऱ्यांना खुल्या भाजी मंडईच्या माध्यमातून एक हक्काची जागा मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:29 PM 30/Nov/2024














