राजापूर : राजापूर तालुक्यातील अणसुरे येथील श्री देव गिरेश्वर यात्रोत्सव आज सोमवार, २ डिसेंबर रोजी होत आहे. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील किल्ले विजयदुर्गसमोर असलेल्या अणसुरे या गावाचे बारा वाड्यांचे जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री देव गिरेश्वर मंदिराचा यात्रोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
दोनच वर्षांपूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला असून अणसुरेच्या उंच टेकडीवर वसलेल्या या मंदिराच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी देखील हजेरी लावत असतात. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने हा यात्रोत्सव संपन्न होत असून रात्री बारानंतर पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. यावेळी लोटांगणे आणि महिला वर्गाकडून पदराने दरबार झाडण्याचा कार्यक्रम पार पडत असतो. या मंदिरात पूर्वी दोन पालख्या असायच्या या दोन्ही पालख्या प्रदक्षिणेसाठी बाहेर पडायच्या. मात्र मानकरी, ट्रस्टी, ग्रामस्थ सर्वांनी एकमताने एकच पालखी ठेवण्याचा निर्णय घेतला असून मागील पाच वर्षांपासून एकच पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते.
या यात्रा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिर ट्रस्ट, ग्रामस्थ, मानकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी नियोजन आणि मेहनत घेत आहेत. यात्रोत्सवाला मोठ्या प्रमाणावर भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव गिरेश्वर मंदिर ट्रस्ट समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 02/Dec/2024














