खेड : भरणे गोवळवाडी येथे तिहेरी अपघातात एक ठार; तिघे जखमी

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे गोवळवाडी येथे एक खासगी बस व दोन दुचाकी अशा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात रविवारी (दि.१) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात एकजण ठार तर तिघेजण जखमी झाले आहेत. मुबीन हुसेन नाडकर (वय २८, रा. संगलट, खेड) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर रवींद्र सुतार, सांची सुतार आणिा राहुल सुतार अशी जखमींची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खेडवरून एक खासगी आरामबस (एम एच ०६ एस ९७३१) मुंबईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी मुंबईच्याच दिशेने जात असलेल्या पळून जाणाऱ्या बसचालकाला पकडले.

दुचाकी (एम. एच. ०८ ए के २९३३) ला या बसची जोराची धडक बसली. ही धडक बसल्यानंतर पहिल्या दुचाकीची पुढे चाललेल्या दुसऱ्या दुचाकीला (एम. एच. ०८ ए एस ९२४१) ला धडक बसली. दरम्यान झालेल्या या अपघातात पहिल्या दुचाकीचा चालक मुबीन हुसेन नाडकर याचा जागीच मृत्यू झाला असून त्याला खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले तर दुसऱ्या दुचाकीवर बसलेले रवींद्र सुरेश सुतार (३३), सांची रवींद्र सुतार (७ वर्षे) व राहुल संतोष सुतार (सर्व रा. कळंबणी) हे तिघे जखमी झाले.

दरम्यान, या घटनेत अपघातस्थळावरुन पळ काढणाऱ्या खासगी बसचा पाठलाग करून घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 02/Dec/2024