रत्नागिरी : जिल्ह्यातील थंडी गायब

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत होती; पण तमिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. दापोली तालुक्यात चोवीस तासांत ८.८ अंश सेल्सिअसवरून पारा ११.१ म्हणजेच ३ अंशांनी वर गेला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि वारे वाहत होते. परिणामी थंडीचा जोर कमी झाला. तापमानात वाढ होऊ लागल्यामुळे हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

फेंगल चक्रीवादळ शनिवारी (ता. ३०) रात्री तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. त्यामुळे पदुचेरी आणि तमिळनाडूच्या उत्तर भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.

त्यामुळे तापमान वाढून थंडी काही प्रमाणात कमी होऊ लागली आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत बगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मागील आठवडाभरात रत्नागिरी जिल्ह्याचा पारा खाली घसरला होता. त्यामुळे सर्वत्र थंडी जाणवत होती. उन मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यासह लांजा तालुक्यातील माचाळमध्ये कडाक्याची थंडी वाढली होती. दापोलीत पारा १३ अंशावरून सहा दिवसांत ८.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. चिपळूण, रत्नागिरीसह राजापूरमध्ये इतर ती १५ अंशापर्यंत खाली आला होता, परंतु तमिळनाडूतील वादळानंतर चोवीस तासांत वातावरणात बदल झाला असून, थंडी कमी होऊ लागली आहे. रविवारी दापोलीत ११.१ अंश सेल्सिअसपर्यंत पारा वर गेला होता.

तीन अंशांची वाढ झाली आहे. समुद्र किनाऱ्यावर वेगवान वारेही वाहत होते. वाऱ्याचा वेग ताशी २.४ किमी वेग होता, मात्र गतवर्षी कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस इतके होते.

गेले सहा दिवस जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडल्यामुळे कलमांना मोहोरही येऊ लागला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत, मात्र रविवारी पारा पुन्हा वर गेला आणि दिवसभर ढगाळ वातावरण होते. हे वातावरण असेच राहिले, तर आंबा कलमांवर किंडरोगांसह तुडतुडपाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पालवी आणि मोहोरावर तुडतुडा अधिक असल्यामुळे औषध फवारण्या सुरू झाल्या आहेत.

यंदा पाऊस लांबल्यामुळे आंबा कलमांना पालवी उशिरा फुटली, त्यानंतर थंडी वाढल्याने मोहोर येण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. परंतु वातावरणात होणारा सध्याचा बदल रोगांना आमंत्रण देणारा आहे. हे वातावरण दोन ते तीन दिवस असेच राहिल्यास बागायतदारांना अडचण होईल.- राजन कदम आंबा बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 02/Dec/2024