रत्नागिरी : धन, प्रतिष्ठेच्या हव्यासापायी रुक्ष झालेल्या जीवनाचा पट

रत्नागिरी : धन आणि प्रतिष्ठेच्या हव्यासापायी आजकाल चाललेल्या धावपळीच्या युगातील जीवनाचा शेवट रुक्षपणात कसा होऊ शकतो, याचे नाट्य रत्नागिरीच्या राज्य नाट्य स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या रुक्ष नावाच्या नाटकात साकारण्यात आले आहे.

रत्नागिरीत राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या त्रेसष्टाव्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत शुक्रवारी (दि. २९ नोव्हेंबर) रत्नागिरीच्या संकल्प कलामंच संस्थेने रुक्ष नावाचे नाटक सादर केले. प्रशांत जगताप यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन कृष्णकांत साळवी यांनी केले.

नाटकातील हिम्मतराव देशमुख हे नाणावलेले वकील आहेत त्यांना वकिली या व्यवसायाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी कमी महत्त्वाच्या वाटतात. त्यांची कन्या सुमन देशमुख हिला मात्र वकिलीमध्ये स्वारस्य नसते. तिच्या आईलाही वकिली आवडत नसते. सुमनच्या वयाच्या दहाव्या वर्षी तिच्या आईचे निधन झालेले असते. त्यानंतर हिम्मतराव देशमुख आपल्या मुलीला लाडाकोडात वाढवतात. तिने चांगला वकील व्हावे, वकील जावयाशी लग्न करावे, अशी त्यांची इच्छा असते. पण तिला मात्र कलेच्या क्षेत्रातच आवड असते. वकिली डावपेचांवर न्यायालयात खटले चालतात आणि अनेक निर्दोष व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो, तर अनेक गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटून जातात. त्यांना कोणतीही शिक्षा होत नाही. त्यामुळे वकिली व्यवसाय तिला आवडत नाही. योगायोगाने हिम्मतराव देशमुख यांच्याकडे शिकण्यासाठी आलेल्या सुहास नलावडे या हरहुन्नरी वकील तरुणालाही कलेमध्ये रुची असते. त्याच्या वकिलीपेक्षाही त्याच्यातील कलाकार सुमनला आवडत असतो. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात, मात्र हिम्मतराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकून सुहास नलावडेही व्यवसायात पत, प्रतिष्ठा आणि पैसा यालाच महत्त्वाचे मानू लागतो. त्यामुळे तो सुमनच्या मनातून उतरतो. दुसरीकडे सुमन ग्रामीण भागात आपल्या कलेला, वृक्षराजी वाढविण्याच्या आवडीला जोपासत असते. त्यातून तिला पुरस्कारही मिळतो. पण हिम्मतराव देशमुख यांनीच न्यायालयाच्या कचाट्यातून सोडविलेल्या सुभानराव जाधव या गुन्हेगाराच्या भावाकडून सुमनवर अतिप्रसंग होतो. सुभानराव हिम्मतराव देशमुख यांना प्रचंड पैसा देण्याचे आमिष दाखवितो आणि त्या बदल्यात सुमनचे आपल्या भावाशी लग्न लावून देण्याची मागणी करतो. अर्थात सुमनला ती मान्य नसते. अखेर आपल्या वडिलांना मागे ठेवून सुमन घरातील अनेक वर्षांचा घरगडी आणि अलीकडेच काम करणारी घरातील मोलकरीण यांच्याबरोबर घर सोडून निघून जाते. त्यामुळे हिम्मतराव देशमुख यांच्या जीवनात रुक्षपणा येतो.

माणसाला समाजात वावरताना प्रेम, माया, ममता, जिव्हाळा, आपुलकी, करुणा, दया या भावनेपेक्षा जेव्हा धन, प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता महत्त्वाच्या वाटू लागतात, तेव्हा त्याच्या हृदयात असणारा मायेचा झरा आटू लागतो. ओलावा सुकू लागतो आणि हळूहळू तो माणूस कोरडा बनतो. रुक्ष बनतो. अशी रुक्ष व्यक्ती समाजाचा तर घात करतेच शिवाय ती स्वकीयांचा आणि पर्यायाने स्वतःचासुद्धा घात करते. जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. रुक्ष या दोन अंकी नाटकातून हेच मांडण्याचा प्रयत्न आहे. अशा रुक्ष व्यक्ती आपणाला समाजात अनेक ठिकाणी दिसतात. नाटक प्रेक्षकांना बरेवाईट याची जाणीव तर करून देतेच, शिवाय या रुक्षतेचा अनुभव देते. प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उभे करते आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी अंतर्मुखसुद्धा करते.

अॅड. हिम्मतराव देशमुख यांची भूमिका विनोद वायंगणकर यांनी चांगली वठवली आहे. माधव मामा (कृष्णकांत साळवी), सुहास नलावडे (धनवंत कासेकर), सुभाणराव जाधव (चंद्रकांत कांबळे), रखमा (सौ. रक्षिता पालव), सुमन देशमुख (कु. सुकन्या ओळकर), संतोष (मयूर पाडावे), नितिन जाधव (सुयोग बारगोडे) योगेश पवार (साहिल तांबट) या भूमिकाही कलाकारांनी चांगल्या साकारल्या आहेत. गणेश गुळवणी, डॉ. दिलीप पाखरे नाटकाचे सूत्रधार होते, तर नेपथ्य नंदकुमार भारती, विनायक अपकरे यांचे होते. योगेश मांडवकर यांचे पार्श्वसंगीत, प्रकाश ठीक यांची रंगभूषा, विनयराज उपरकर, सागर सकपाळ यांची प्रकाशयोजना, वेशभूषा (ज्ञानेश्वर पाटील, कु. सोनम साळुंखे), रंगमंच व्यवस्था (गजानन गुरव, सत्यविजय शिवलकर, रवींद्र मुळ्ये, गुरुदेव नांदगावकर, श्रीमती शलाका सावंतदेसाई) या तांत्रिक बाबीही लक्षणीय होत्या.

नाटकाचा लाभ ४९६ प्रेक्षकांनी घेतला. त्यातून ६ हजार २६५ रुपयांची तिकीट विक्री झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 02-12-2024