दापोली : दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनारी शनिवारी (ता. ३०) सायंकाळी गाडी पाण्यात बुडण्याची घटना घडली. पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून ही तिसरी घटना आहे. दापोली तालुक्याच्या किनारपट्टीवर ह्या घटना या हंगामामध्ये वारंवार होऊ लागल्या आहेत.
कर्दे, मुरुड, हर्णे, पाळंदे आणि आंजर्ले बीचवर सर्रास हे प्रकार होऊ लागले आहेत. या बीचवर गाडी घेऊन जाण्यास कोणीही आडकाठी करत नाहीत. मुरुड, पाळंदे आणि हर्णे बीचवर सुरक्षारक्षक असतात. परंतु, पर्यटक त्यांचे ऐकत नाहीत. तसेच इतर बीचवर ग्रामस्थ जाऊ नका म्हणून ओरडत असतात, त्यांनाही पर्यटक दाद देत नाहीत.
आता प्रत्येक आठवड्याच्या विकेंडला पर्यटकांची गर्दी दापोलीतील किनाऱ्यावर होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी पोलिस, संबंधित ग्रामपंचायतीने ठोस उपाय करणे गरजेचे आहे. आंजर्ले किनाऱ्यावर बुडालेल्या गाडीला ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले. तसा सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. पर्यटकांनी उत्साहाला आवर घालावा, जीवघेणी स्टंटबाजी करू नये अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सध्या गाड्या बुडण्याचे प्रकार खूपच घडू लागले आहेत. यासाठी दापोली पोलिस ठाण्याच्या एका विशेष पथकाची नेमणूक करत संपूर्ण पर्यटन हंगाम संपेपर्यंत हे पथक कार्यरत राहील. एकूण चार पोलिस आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हे पथक असेल. कोणीही पर्यटक अरेरावी करताना दिसला तर त्याच्यावर थेट कारवाई करण्यात येईल. – विवेक अहिरे, दापोली पोलिस निरीक्षक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 02/Dec/2024














