चिपळूण : शहरानजीकच्या कोंढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तसेच घरडा व टीडब्ल्यूजे फाऊंडेशन यांच्या वतीने वनराई बंधारा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसाक्षरता अभियान अंतर्गत आज २ रोजी सकाळी ९ वा. कोंढे माळवाडी येथे श्रमदानातून बंधारा बांधण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
त्याचबरोबर २ ते ९ डिसेंबर या कालावधीत विजय आणि वनराई बंधारा बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून ४ रोजी सकाळी ९.३० वा. गुणदे, ६ रोजी सकाळी ९.३० वा. केतकी, ९ रोजी सकाळी ९ वा. रेहेळ भागाडी आदी ठिकाणी बंधारा बांधण्यात येणार आहे. कोंढे येथे वनराई बंधारा बांधकाम सामाजिक संस्था व गावातील ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून होणार आहे. एकूण पाच साखळी बंधारे बांधले जाणार आहेत. एका बंधाऱ्यात एक लाख लिटर पाणी साठवणूक क्षमता आहे. पाच साखळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाच लाख लिटर पाणी साठविण्याची व्यवस्था होणार असून परिसरातील पाच एकर जमीन ओलिताखाली येऊ शकेल. रब्बी हंगामातील शेतीचे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतात. प्रामुख्याने शेती उत्पादन घेणे शक्य नसल्यास पर्यायी उत्पादन म्हणून गुरांसाठी चारा लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले जाणार आहे. हे बंधारे बांधण्याकरिता आवश्यक असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या जमा करण्याचे काम जलदूत शाहनवाज शाह यांनी हाती घेतले आहे. तसेच मनोज भोजने, शकील मुकादम यांच्या माध्यमातून दोन हजार प्लास्टीक पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामस्थ व सामाजिक संस्थेच्या वतीने बंधारे बांधण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 02/Dec/2024














