लांजा : अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षा व NMMS परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी पैसे देऊन विद्यार्थ्यांना जादा क्लास लावावे लागतात. मात्र गेल्या ३८ वर्षांपासून लांजा तालुक्यामध्ये स्वर्गीय काकासाहेब सरफरे यांच्या कृपेने विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, व्याख्यानमाला उपलब्ध करून दिले जात आहे. हे सामाजिक, शैक्षणिक कार्य सहज आणि सोपे नाही. लांजात सुरू असलेल्या या मोफत मार्गदर्शन वर्गाचा सर्वच विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचे, आपल्या शाळेचे, गुरुजनांचे आणि आई-वडिलांचे नाव लौकीक करावे, असे प्रतिपादन करून मोफत शैक्षणिक उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन यावेळी लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना केले.
शिवसेनेचे माजी तालुका संपर्क प्रमुख स्वर्गीय काकासाहेब सरफरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माजी बांधकाम सभापती दत्ता कदम आयोजित व लांजा तालुका माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या सहकार्याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेचे मार्गदर्शन व प्रश्नसंच वितरण कार्यक्रम शनिवारी शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय, हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयवंत शेट्ये बोलत होते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग व प्रश्नसंच वितरण कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक सुबोध सरफरे यांचे बंधू राजू सरफरे, न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम वांजरे, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, कोल्हापूर येथील जितेंद्र म्हैशाळे (मुख्याध्यापक जयवंत माध्य. विद्यालय मजले), डॉ. सचिन कोंडेकर (प्राचार्य श्रीमती इंदिरा गांधी माध्य. विद्यालय अॅण्ड ज्यु. कॉलेज वडगाव, कोल्हापूर), ए आर. पाटील (पेपर सेक्टर आणि बुद्धीमत्ता मार्गदर्शक, कोल्हापूर), श्रीकांत पाटोळे, (कोल्हापूर), लांजा शिक्षण विस्तार अधिकारी विजय बंडगर उपस्थित होते.
कोल्हापूर येथील मार्गदर्शक जितेंद्र म्हैशाळे म्हणाले की, आजकाल एखादा उपक्रम घ्यावयाचा म्हटला तर काही दिवस, वर्षे उपक्रम सुरू राहतो नंतर मध्येच थांबवला जातो. मात्र सरफरे बंधू यांच्या माध्यमातून गेली ३८ वर्षे शैक्षणिक काम सुरू आहे ते कौतुकास्पद आहे. यावेळी NMMS परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच मोफत वाटप करण्यात आला. या उपक्रमाचा तालुक्यातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 02/Dec/2024














