चिपळूण : वालावलकर रुग्णालयात कर्मचारी घेणार राज्य विमा योजनेतून मोफत उपचार

सावर्डे : वालावलकर रुग्णालय डेरवण येथे कर्मचारी राज्य विमा योजना १ मे २०२४ पासून सुरु झाली असून, या योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या राज्य विमा महामंडळाची जागतिक स्तरावरील सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा योजना आहे.

भारतात लाखोंच्या संख्येने कामगार आहेत. एकाच कार्डमुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकाचवेळी लाभ घेणे जिकिरीचे ठरू नये, यासाठी इ. एस. आय. सी ने प्रत्येक कर्मचाऱ्याला ‘पेहचान कार्ड’ नावाने प्रसिद्ध असलेल्या दोन कार्डस चे वाटप केले आहे. जेणेकरून कुटुंबीय आणि कर्मचारी आपापल्या राहत्या ठिकाणाहून योजनेंतर्गत लाभ घेऊ शकतात. डेरवण येथील वालावलकर रुग्णालय हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हातील एकमेव ईएसआयसीच्या पॅनलवर असलेले रुग्णालय असल्याने संपूर्ण कोकणातील ईएसआयसी कर्मचाऱ्यांना वालावलकर रुग्णालयात मोफत उपचार घेणे सोईचे होणार आहे. त्यासाठी बाह्यरुग्ण अंतर्गत उपचार करायचे असल्यास रेफरल लेटर व पेहचान कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे. रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास रुग्ण पेहचान कार्ड घेऊन योजनेमध्ये मोफत उपचार घेऊ शकतो. इतर उपचार आंतररुग्ण विभागात करावयाचे असल्यास रेफरल लेटर आणि सर्व कागद पत्रांची पूर्तता असणे आवश्यक आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:58 PM 02/Dec/2024