दापोलीतील विविध समस्यांमुळे पर्यटकांमध्ये नाराजी

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांकडून दापोली तालुक्याला मोठी पसंती दिली जाते. मुलांच्या शाळांना सुट्ट्या पडल्या की पालकवर्ग तसेच मुलेही समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी दापोलीकडे धाव घेतात. दरवर्षी लाखो पर्यटक दापोलीला पसंती दर्शवितात; मात्र लाखोंच्या संख्येने दापोलीत येणाऱ्या या पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतात का? त्यांना तालुक्यात विविध पर्यटनस्थळी जाण्यासाठी मार्गदर्शक फलके आहेत का? तसेच तालुक्यातील अंतर्गत रस्ते सुरक्षित आहेत का, यासह अनेक प्रश्न दापोलीत येणाऱ्या पर्यटकांना भेडसावतात.

या समस्या अशाच सुरू राहिल्या तर रत्नागिरी जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून कधी होणार, असा सवाल दरवर्षी शासनाला येथील पर्यटन व्यावसायिक तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांकडूनही विचारला जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या विकासासाठी सन २०२२ ते २०२५ या कालावधी सिंधुरत्न योजना राबविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. सिंधुरत्न योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबवून त्याचे अनुकरण इतर जिल्हे करतील, अशा पद्धतीने योजनेची आखणी करण्यात आली आहे.

सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून कोकणचा सर्वांगिण विकास, या योजनेतंर्गत दोन्ही जिल्ह्यांना पर्यटनाच्या शिखरावर ठेवण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र या योजनेतंर्गत दापोलीत काहीच होताना दिसत नाही. कोकणातील पर्यटन जलदगतीने वाढत असताना पर्यटन मात्र सुधारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या तालुक्यात सोयीसुविधांची कायम वानवा आहे. पर्यटन क्षेत्रात सुरूवातीला भेडसावते ती रस्त्यांची समस्या, असंख्य खड्डे असलेले रस्ते त्यात देखील अनेक अरुंद रस्ते त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडतात. तर अनेकवेळा या रस्त्यांवर ट्रॅफिक जामची समस्याही निर्माण होते. यामधून अनेक वाहनचालकांमध्ये बाचाबाची देखील होताना दिसून येते. तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात पर्यटन दिशा मार्ग, त्याबर पर्यटनस्थळांची नावे नसल्याने अनेकदा पर्यटक भरकटताना दिसून येतात. या समस्या कमी की काय तर याचबरोबर मोबाईलला नेटवर्क नसणे, अनेक समुद्र किनारी आसन व्यवस्था नसणे, लाईटची सुविधा नाही याचबरोबर पर्यटनस्थळांवर योग्य पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेकवेळा अशा ठिकाणी बेशिस्त पार्किंग होते. समुद्र किनारी चेंजिंग रूमची कमतरता, बाथरूम सुविधा तसेच सुरक्षा रक्षक नसणे अशा अनेक समस्या दापोली तालुक्यात पर्यटकांना अनेक वर्षांपासून भेडसावत आहेत. तालुक्याचा विस्तार हा गावागावातून असल्याने अनेक ठिकाणी तालुका नकाशा असणे आवश्यक आहे. त्यामुळे येथील पर्यटन वाढीत भर पडेल. मात्र दापोली तालुक्याचा अधिक विकास व्हावा असे प्रशासनाला स्थानिक लोकप्रतिनिधींना वाटत नसल्याचे दिसून येत आहे.

दापोलीचे ग्रो टुरिझमवर लक्ष देणे गरजेचे

आगामी काळात कृषी पर्यटन ग्रो टुरिझमवर भर दिल्यास, त्याठ सबसिडी दिल्यास येथील पर्यटन अधिक वाढेल आणि येथील तरुणाच्या हाताला काम मिळेल. सागरी जल पर्यटन यालादेखील येथे वाव आहे. त्यामुळे जल पर्यटनांतर्गत क्रूज धावण्यासाठी जिल्ह्यामध्ये तीन ते चार ठिकाणी थांबे द्यावेत त्या ठिकाणी बंदराचा विकास होईल.

अनेकदा शासनाच्या योजना फक्त कागदावर असतात. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. येथील पर्यटनाला अधिक वाव आहे. मात्र, येथे सुविधा देण्यास अनेकदा राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे येथील पर्यटन म्हणावे तसे अद्याप वाढत नाही. -ऋषीकेश गुजर, तालुका प्रमुख, उबाठा, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 02/Dec/2024