शिवसेना-NCPतील फूट जनतेच्या हितासाठी झाली का? आमच्या आयुष्याचा खेळ केला : संभाजीराजे छत्रपती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपावर खल करताना दिसत असून, दुसरीकडे या दोन्हींना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडण्यात आली आहे.

राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी ही आघाडी केली असून, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील झालेली फूट ही जनतेच्या हितासाठी केली का, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना महायुती आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. गड किल्ल्यांना ७५ वर्षांत किती पैसे दिले सांगा, माझे चलेंज आहे. ३५० गड कोट किल्ल्यांचे काय केले? नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेता , रायगड अध्यक्ष झालो म्हणून काही करू शकलो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले. तसेच ७५ वर्षात फक्त १ कोटी खर्च. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते. १२ डिसेंबर रोजी सांगितले की, योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधक गप्प बसले होते, असे संभाजीराजे म्हणाले.

लोकांच्या प्रश्नासाठी नाही तर स्वार्थासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले

भाजपा विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होती. काँग्रेसच काही वेगळेच सुरू होते. एनसीपी कुणाची , शिवसेना कुणाची सगळा गोंधळ होता. गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक म्हणतात. तसे एनसीपी, शिवसेनेचे झाले आहे. शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असे झाले. हे का जनतेच्या हितासाठी झाले का? हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हे असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला. तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

दरम्यान, आम्ही जात धर्माच्या नावाने एकत्र आलो नाही, धर्मनिरपेक्षता घेऊन आम्ही मैदानात आलो. महाराष्ट्र घडवण्यासाठी हे परिवर्तन गरजेचे आहे म्हणून आम्ही मैदानात उतरलो. महाराष्ट्राचा सातबारा आपल्या बापाचा आहे असे सगळे सुरु आहे, मात्र हा सातबारा कष्ट करी जनतेचा आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:31 26-09-2024