रत्नागिरी : आंबा मोहोर गळण्याची भीती

रत्नागिरी : भारताच्या पूर्व किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरणही बदलले आहे. थंडी गायब झाली असून, मंगळवारी दिवसभर ‘मळभट’ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा मोहोराला बसणार आहे. मच्छीमारीलाही काही प्रमाणात लगाम बसला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल वादळाचा तडाखा तामिळनाडूला बसला असून, या वादळामुळे आंध्र प्रदेशसह कर्नाटक आणि केरळमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळाच्या प्रतिकूल परिणामामुळे राज्यातील वातावरणही बदलले असून, थंडी गायब झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातही थंडीला मागील पाच-सहा दिवसांपासून सुरुवात झाली होती. धुके आणि गारठ्यामुळे आंबा पीक चांगले येण्याचे संकेत मिळत होते. परंतु, दोन-तीन दिवसापासून फेंगल वादळामुळे जिल्ह्यातील परिस्थिती बदलली असून, वातावरणात बदल झाला आहे. मंगळवारी वातावरणात मळभट आली होती. पाऊस पडण्याचे अंदाजही वर्तवले जात होते. त्यामुळे कलमे मोहोरण्यास अडथळा निर्माण होणार आहे.

आंब्याबरोबरच खोल समुद्रातील मच्छीमारीवरही याचा परिणाम झाला असून पाण्याचे करंट बदलले आहेत. त्यामुळे मोठ्या नौकांनी किनार्‍यावरच थांबणे पसंत केले आहे. पाण्याच्या बदलत्या करंटमुळे समुद्रात टाकण्यात येणारी जाळी गुंडाळली जात असल्याने मच्छीमारीवर परिणाम होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 04-12-2024