ओडिशा दुर्घटनेतील तरुणाच्या मृतदेहावर हातखंबा-तारवेवाडीत अंत्यसंस्कार

रत्नागिरी : ओडिशातील एका कंपनीत गॅस गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत मृत तरुणाचा मृतदेह काल सायंकाळी हातखंबा-तारवेवाडी येथे आणण्यात आला. उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महेश गोविंद घवाळी (वय-३७ रा. हातखंबा, तारवेवाडी) असे दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. हातखंबा परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. गॅस गळती होऊन तरुणाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रत्नागिरी एमआयडीसी परिसरात असलेल्या एका बड्या कंपनीचा एक प्लॉट काही वर्षापूर्वी ओडिशाला हलविण्यात आला होता. हा प्लांट तेथे नेल्यानंतर रत्नागिरीत प्लांटमध्ये काम करणारे अनेक कामगार ओडिशाला गेले होते. ते त्याच प्लांटमध्ये काम करत होते. ओडिशातील त्या प्लांटमध्ये मोठी दुर्घटना झाल्याची माहिती रत्नागिरीत धडकली. या माहितीनंतर कामगारांच्या कुटुंबांमध्ये घबराट निर्माण झाली होती. जो तो आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधत होता. अनेकांचे फोन बंद आल्याने त्यांची भीती अधिकच वाढली. अखेर हातखंबा-तारवेवाडी येथील तरूण महेश घवाळी याचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी गेले होते. काल सायंकाळी त्याचा मृतदेह गावी आणण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 05/Dec/2024