चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कापरे येथे असलेल्या वरचीवाडीमधील सुमारे ४०० ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न स्वयंपूर्ण ग्रॅव्हिटी योजनेच्या माध्यमातून सोडविण्यात यश मिळाले असून त्यामध्ये भविष्याच्या दृष्टीने अधिक पाण्याची उपलब्धता होण्यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ही योजना प्रथम २०१६ मध्ये हाती घेण्यात आली. तब्बल आठ वर्षांनंतर या योजनेचा लाभ वाडीतील चाकरमानी ग्रामस्थांना होत आहे. कोकणातील ग्रॅव्हिटी योजनेच्या माध्यमातून थेट घराघरांत पाणीपुरवठा करणारी ही पहिलीच वाडी म्हणून कापरे वरचीवाडीची ओळख निर्माण झाली आहे.
कोकणामध्ये पावसाळी हंगामात सुमारे चार हजार मि.मी. पाऊस कोसळतो. मात्र, पावसाळा सोडल्यानंतर पुढील सहा महिन्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. प्रामुख्याने कोकणातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते. या समस्या लक्षात घेता तालुक्यातील भोम-कापरे येथील कापरे वरचीवाडीमधील सुमारे साठ ते सत्तर उंबरठा असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी वाडीची पाणी समस्या सोडविण्यासाठी एकत्र येत नियोजन सुरू केले. प्रामुख्याने या गोष्टीला महत्त्वाचे मार्गदर्शन चिपळूण नगर परिषदेतील प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांचे मिळाले. कापरे गावातील ग्रामपंचायतीची नळपाणी योजना आहे. मात्र, ही वाडी टेकडीच्या वरच्या भागात असल्याने पाणी योजनेचा लाभ वाडीतील सुमारे चारशे ग्रामस्थांना होत नव्हता तर ग्रा.पं.च्या पाणी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन दीड-दोन कि.मी.ची पायपीट करावी लागत होती. वाडीच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगरपठार कातळावरील सुमारे १० गुंठे जागा वाडीतील ग्रामस्थांनी खरेदी केली. श्रमदान आणि लोकवर्गणी गोळा करून या जागेत मोठ्या प्रमाणात तलाव खोदण्यात आला. त्यापूर्वी वाडीच्या वरच्या बाजूला डोंगरात पाण्याचे स्रोत शोधण्यात आले. त्या ठिकाणी झरा आढळून आल्यावर कातळ पठारावर मोठे तळे खोदले आणि तेथूनच वाडीच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेला मूर्तरूप प्राप्त झाले. आठ वर्षांपूर्वी जागा खरेदीसह ही योजना राबविण्याकरिता सुमारे सात ते आठ लाखांचा खर्च झाला.
तोही ग्रामस्थांनी वर्गणीतून केला. त्याचबरोबर श्रमदान करून पाईपलाईन टाकली. तळ्याच्या सुरुवातीला मोठ्या व्यासाचे पाईप, दुसऱ्या टप्प्यात त्यापेक्षा कमी व तिसऱ्या टप्प्यात त्याहीपेक्षा कमी व शेवटी घराघरापर्यंत कमी व्यासाच्या पाईपद्वारे उच्च दाबाने ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेने मूर्तरूप गाठले. या सर्व कल्पनेत न.प. चे प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर तांत्रिक सहकार्य व श्रमदान यासाठी जलदूत शाहनवाज शाह यांच्यासह शिक्षक बळीराम मोरे, आत्माराम पवार, संदीप कदम, बाळा मोरे, संजय कदम, संतोष मोरे यांनी योजनेसाठी मोठे योगदान दिले आहे.
मंदिरे नको ग्रॅव्हिटी पाणी योजना उभाराव्यात..
कोकणातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ व्यवसाय, नोकरीनिमित्त मोठ्या प्रमाणावर मुंबईत आहेत. निवृत्त झाल्यावर त्यांना गावी राहाण्याचे वेध लागतात. मात्र, पाण्याच्या समस्या आहे, मात्र, आता कापरे वरचीवाडीने केलेल्या ग्रॅव्हिटी योजनेची सुविधा लक्षात घेता चाकरमान्यांनी गावात देऊळ बांधण्यापेक्षा अशी योजना राबववी, असे बोलले जात आहे.
अपवाद वगळता कोकणातील बहुतांश ग्रामीण भाग हा छोट्या टेकड्या, डोंगर, पर्वत यांनी वेढलेला आहे. गावातील छोट्या वाड्या डोंगर उताराच्या पायथ्याशी आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही सहा महिने पाणी टंचाई भासते, यावर उपाय म्हणून पाणी जमिनीत झिरपावे यासाठी जळगाव पॅटर्नप्रमाणेच डोंगर उतारावर पडीक जागा शोधून त्या ठिकाणी उभे आडवे चर खोदल्यास पावसाचे पाणी त्यामध्ये झिरपून डोंगराच्या पायथ्याशी येईल व जमिनीत झिरपेल. –जलदूत शाहनवाज शाह.
कोकणातील पाणी समस्या असलेल्या गावांनी डोंगर उतारावरील नैसर्गिक जलस्त्रोताचा वापर करून ग्रॅव्हिटी अर्थातच सायफन सिस्टीमची पाणी योजना उभारावी. त्यासाठी श्रमदान, लोकवर्गणीतून खर्च करता येईल. ही कल्पना आपल्याला चिपळूण न.प.ने वीस वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या कोळकेवाडी धरणातील ग्रॅव्हिटी पाणी योजनेवरून सूचली. –अनंत मोरे, योजनेचे मार्गदर्शक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 05/Dec/2024












