रत्नागिरी : एड्स या आजाराबाबत आरोग्य विभागाने समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याने या आजाराच्या चाचण्या करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. योग्य उपचारामुळे बाधित मातेचे बाळही निरोगी निपजत आहे.
गेल्या पाच वर्षांत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात २ लाख १५ हजार ९०० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात ४५७ व्यक्ती (०.२ टक्के) बाधित आढळल्या. बाधित गरोदर मातांचे प्रमाण तर केवळ ०.०३ टक्के आहे.
एड्स आजाराबाबत अनेक गैरसमज असल्याने चाचण्या करून घेण्यासाठी कुणी पुढे येत नव्हते; मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षातर्गत (District Aids Prevention and Control Unit) सुरू असलेले समुपदेशन केंद्र तसेच विविध सामाजिक संस्थांचे जनजागृतीत असलेले योगदान यामुळे ग्रामीण भागातील पुरुष आणि गरोदर माता या केंद्राच्या चाचण्या करण्यास अनुकूलता दाखवू लागल्या आहेत. चाचण्यांमध्ये वाढ होत असून, त्यामुळे एचआयव्ही बाधितांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे.
या बाधितांना जिल्हा रुग्णालयाच्या या केंद्रामार्फत मोफत उपचार पुरवले जात आहेत. आरोग्य विभागाने बाधित गरोदर मातांसाठी तसेच प्रसूती आणि त्यानंतर तिचा स्तनपान कालावधी यासाठी विशेष उपचार उपलब्ध करून दिले असल्याने तिचे बाळ निगेटिव्ह होऊ शकते. ती माताही ६ महिन्यांपर्यंत स्तनपान करू शकते. माता-पिता बाधित असले तरी जन्मास येणारे बालक उपचाराने निरोगी होऊ शकते, हा दिलासा आता एड्सबाधित माता- पित्यांना मिळू लागला आहे.
एचआयव्हीग्रस्त बालक जन्माला येण्याचे प्रमाण शून्य
एचआयव्हीग्रस्त गरोदर मातेचे बाळ निरोगी निपजावे यासाठी अशा मातेच्या प्रसूती आधीपासून तिच्यावर योग्य उपचार सुरू होतात; पण प्रसूतीनंतर बाळालाही पहिले सहा आठवडे ‘नेव्हीरपिन’ सिरप दिले जाते. ३ महिन्यांनंतर त्या बाळाची ‘डीबीएस’ टेस्ट घेतली जाते. सहा, बारा आणि १८ महिन्यांनंतर म्हणजेच बाळ दीड वर्षाचे झाल्यानंतर पुन्हा त्या बाळाच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळेच जिल्हा रुग्णालयात एचआयव्हीग्रस्त बालक जन्माला येण्याचे प्रमाण शून्य आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 05/Dec/2024














