अतिवृष्टीमुळे राज्यातील ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

पुणे : राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारा जिल्ह्यांमधील तब्बल ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ८ हजार हेक्टरवरील नुकसान एकट्या बीड जिल्ह्यामध्ये झाले आहे.

सोयाबीन, कापूस, कांदा, भाजीपाला, मका, उडीद मूग या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ११४ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परतीच्या पावसामुळे राज्यातील खरीपातील पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.

सोयाबीन, मका, बाजरी, कांद्याला फटका

राज्यात मंगळवारी व बुधवारी झालेल्या पावसामुळे १२ जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग या पिकांना फटका बसला आहे.

सध्या सोयाबीन पक्वतेच्या अवस्थेत असून पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. उडीद, मूग पिकाची काढणी झाली असून उघडीप मिळाल्यानंतर उत्पादन हाती येणार आहे. मात्र, पावसाची हजेरी कायम असल्याने शेतकऱ्यांनी अद्याप मळणी केलेली नाही.

बाजरी पीकही अंतिम टप्प्यात असून याच टप्प्यात पाऊस कायम राहिल्यास बाजरीचेही नुकसान होण्याची भीती आहे. कापूस पिकाला हा पाऊस दिलासादायक असून यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

१२ जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 27-09-2024