Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास आणखी मुदतवाढ मिळणार?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. ही आकडेवारी 24 सप्टेंबरपर्यंतची आहे. अधिकाअधिक महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. आतापर्यंत या योजनेसाठी 2.5 कोटी अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 2 कोटी 40 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या विशेष शिबिरांमुळं अर्जांच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती आहे.

पुणे जिल्ह्यात 18 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 14 लाख, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यात 10 लाख अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. मात्र, यासाठी संबंधित महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारनं पुरवणी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. मात्र,त्यानंतर सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं लाडली बहना योजना सुरु केली होती त्याचा त्यांना पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी फायदा झाला होता.

29 सप्टेंबरला तिसरा हप्ता जमा होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. महिलांना 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला अनुक्रमे पुणे आणि नागपूरमध्ये कार्यक्रम घेऊन पैसे वितरित करण्यात आले होते. आता 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आयोजित करुन महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत, अशी माहिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 27-09-2024