राज्यात निर्माण झालेल्या डिझेलच्या टंचाई सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला. राज्यात डिझेल आणि पेट्रोलची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असून, काही ठिकाणी होत असलेली साठेबाजी अजिबात सहन केली जाणार नाही.
यासाठी पुरवठा विभागाला कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच, केंद्र सरकारने कांदा खरेदीच्या भावात वाढ केल्याची माहिती देत त्यांनी विरोधकांच्या आंदोलनावरही टीका केली.
डिझेलची मागणी ५२ टक्क्यांनी वाढली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधनाच्या मागणीची आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले, “गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेट्रोलच्या मागणीत २३ टक्के, तर डिझेलच्या दैनंदिन मागणीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली आहे. भंडारा, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तर डिझेलची मागणी ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. एवढी मागणी वाढूनही आम्ही शेतकऱ्यांना डिझेलचा पुरवठा सुरळीत करत आहोत.
काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. ते डिझेलची साठेबाजी करत असल्याचे समोर आले आहे, यामुळे टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. ही साठेबाजी रोखण्यासाठी पुरवठा विभागाला कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत,” असेही फडणवीस यांनी नमूद केले.
कांदा प्रश्नी उद्या केंद्रासोबत महत्त्वाची बैठक
“केंद्र सरकारने कांदे खरेदीचा भाव ३.५० रुपयांनी वाढवून तो थेट १५ रुपयांपर्यंत नेला आहे. आम्ही स्वतः केंद्र सरकारला कांदा प्रश्नावर बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उद्या (बुधवारी) दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी फडणवीस यांनी कांदा प्रश्नावरुन विरोधकांवर टीका केली. “आमचे सरकार शेतकऱ्यांसंदर्भात संवेदनशील आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून कांद्याला १५ रुपये खरेदी दराचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जे लोक आज उगीच राजकारण करत आहेत, त्यांच्या सत्ताकाळात कधी शेतकऱ्यांना पंधरा रुपयांचा दर देऊन कांदा खरेदी केला का? असा सवालही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
“आम्ही शेतकऱ्यांसाठी बैठक घेत आहोत. आम्हाला कल्पना आहे, फक्त कांदा खरेदीचा दर वाढवून चालणार नाही. या बैठकीत दिर्घकालीन काही होईल का याचा विचार केला जाणार आहे. विरोधकांचे आंदोलन राजकीय आहे. असा टोलाही त्यांनी लगावला. प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. त्यामुळे त्या कोणावर बोलतात हे कळत नाही. बोलताना थोड भान राखले पाहिजे, असे प्रत्युत्तर शिंदे यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:41 26-05-2026














