गुहागर : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालयामार्फत “महोत्सव भारतीय सणांचा, सांस्कृतिक परंपरेचा” हा विशेष राहुटी कार्यक्रम दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रशालेच्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून भारतीय पारंपरिक सण व सांस्कृतिक परंपरा यांचे दर्शन सर्वांना अनुभवायला मिळणार आहे.
दरवर्षी हा आगळावेगळा राहूटी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, संस्थेचे संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक लकेश्री सर, व पर्यवेक्षक पवार सर यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी भारतीय सणांच्या विविध परंपरांचा आणि संस्कृतीचा रंगीत आविष्कार सादर करणार आहेत. सणांचे महत्त्व, त्यामागील शास्त्रीय व ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच एकात्मतेचा संदेश विद्यार्थी सादरीकरणातून देणार आहेत. यामध्ये गुढीपाडवा, शिमगा, दीपावली, मकरसंक्रांत, वटपौर्णिमा, नवरात्र, लोहरी, कालिपूजा, ओणम, वसंतपंचमी, पोंगल, छटपूजा रामनवमी यांसारख्या सणांची रंगतदार झलक सादर करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 07/Dec/2024