दापोली : हर्णे समुद्रकिनारी बेपत्ता खलाशाचा मृतदेह आढळला

दापोली : बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह काल हर्णे येथील समुद्रकिनारी आढळून आला. संजय शांताराम पोस्टुरे (वय ३७, रा. पंदेरी बहिरवलीवाडी, ता. मंडणगड) असे त्या खलाशाचे नाव असून तो पाजपंढरी येथील सिद्धिविनायक मासेमारी नौकेवर कामाला होता. त्या नौकेवर नौकेचा तांडेल धरून एकूण सहा खलाशी होते. ५ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास मासेमारी नौका समुद्रात गेली होती.
८ डिसेंबरला रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान ही नौका मासेमारी करून बंदरात आली. त्यानंतर सर्व खलाशी नौकेमध्येच जेवण करून झोपले होते.

९ डिसेंबरला पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान बोटीवरील खलाशी निवास हुंमणे हा जागा झाला. त्यावेळी त्याला बोटीवर त्याच्या शेजारी झोपलेला खलाशी संजय पोस्टुरे दिसला नाही. त्याने लगेच सर्व खलाशांना उठवून नौकेवर शोध घेतला, पण तो मिळाला नाही. याप्रकरणो दापोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. काल हर्णे बायपास पाळंदे येथे सकाळी ९.३० वाजता समुद्रकिनारी संजय पोस्टुरेचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. मृतदेहाचे विच्छेदन करून सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास हर्णे येथील पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 11/Dec/2024