माखजन : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर आरवली उड्डाणपुलाच्या दुतर्फा असलेल्या सर्व्हिस मार्गाचे अद्याप डांबरीकरण न झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक तसेच पादचारी हैराण झाले आहेत.
या मार्गावर असलेल्या असंख्य खड्यांमुळे तसेच रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने येथील रहिवासी व दुकानदार धुळीमुळे त्रस्त झाले आहेत.
आरवली येथील वाहतूकही उड्डाणपुलावरून सुरू होऊन अनेक महिने उलटले. तरी सर्व्हिस रोडवर काहीही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पावसाळ्यात चिखलाचा तर आता धुळीचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
येथील मुंबईकडे जाणारा व मुंबईकडून गोव्याच्या दिशेने असलेला सर्व्हिस रोड तत्काळ डांबरीकरण करावा, अशी मागणी वाहनचालक, ग्रामस्थांमधून होत आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे मंगेश परकर यांनी दिला आहे.
या सर्व्हिस रोडवर सर्वत्र खड्यांसोबतच खडी विखुरली आहे. यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 13/Dec/2024