विरोधी उमेदवाराला मदत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे : राजन साळवी

रत्नागिरी : राजापूर हा गेली तीस वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तो ढासळला. शिवसेनेचा हा गड ढासळायला कोण कारणीभूत आहे, याची कारणं शोधली पाहिजेत. ज्यांनी विरोधकांना मदत करून शिवसेनेच्या विजयाची परंपरा खंडित केली, त्या दोषींवर आमचे वरिष्ठ नक्की कारवाई करतील, असा आशावाद राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला.

राजन साळवींचा (Rajan Salvi) राजापूर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तसेच, जिल्हाप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी झालेली होती. त्याला महिना उलटूनही त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना साळवी यांनी दोषींवर वरिष्ठांकडून कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

राजन साळवी म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील माझा पराभव हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena ubt) पदधिकाऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी चुकीचे काम केले असेल. कोणाकडे बोट दाखवलेले असेल, त्या लोकांच्या बाबतीत आत्मचिंतन करून वरिष्ठांनी त्यामध्ये लक्ष लागून गेली तीस वर्षांपासून असलेला शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळायला कोण कारणीभूत आहे, याची कारणं शोधली पाहिजेत.

ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयाची परंपरा खंडीत केली आहे आणि समोरच्या आमच्या विरोधातील उमेदवाराला मदत केलेली आहे. याचा सर्व्हे करून दोषींवर कारवाई केली पाहिजे. ही मागणी आमच्या मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. माझीही तीच मागणी वरिष्ठांकडे असणार आहे, असेही माजी आमदार साळवी यांनी सांगितले.

ते म्हणाले, राजापूर, लांजा, रत्नागिरी अशा ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्या त्या ठिकाणी हे मुद्दे पुढे आलेले आहेत. त्याचा अहवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे. त्यांच्याकडून दोषींवर कारवाई केली जाईल. त्या अहलावार वरिष्ठ निर्णय घेतील, असा आशावाद आम्हाला आहे. विनायक राऊत यांचे चांगलं काम कोकणात आहे. संपूर्ण कोकणात शिवसेना रुजवलेली, वाढवलेली आणि मोठी केलेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:07 02-01-2025