“कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही” : अजित पवार 

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहताहेत. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलची चर्चा सुरू झालीये. महायुती आणि महाविकास आघाडीत याबद्दल वेगवेगळ्या नावांभोवती चर्चा फिरतेय.

अशात अजित पवारांनी राज्यांना पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, माझा रेकॉर्ड कुणालाही मोडता येणार नाही.

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये जन सन्मान यात्रेची सभा झाली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाच वेळा महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री केले, असे म्हणत भावना व्यक्त केल्या.

अजित पवार काय म्हणाले?

“मला भरभरून या राज्याने दिलं आहे. आपलं रेकॉर्ड कुणी मोडणार नाही. पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो. कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही. कोण पाच वेळा उपमुख्यमंत्री होणार आहे? माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो. जाऊ द्या, त्याचा भाग वेगळा”, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी शिकणाऱ्या मुलांचे पिळले कान

मुलींचे कौतुक करताना अजित पवारांनी विद्यार्थ्यांचे कान पिळले. ते म्हणाले, “बाप बापड्यांपेक्षा महिला चांगलं काम करतात. कारण मी पुरुष आहे, मला माहिती आहे. तुम्ही बघा बारावीचा निकाल बघा. सगळ्यात जास्त मेरीटमध्ये कोण आहे, मुली. मुलं कमी. दहावीचा निकाल काढा. सगळ्यात जास्त मेरीटमध्ये मुली. मुलं कमी, कारण मुलांना इकडं काय चाललंय, तिकड काय चाललंय? ही कशी दिसती, ती कशी दिसती. अरे अभ्यास कर ना. ती कशी दिसती, ती चांगलीच दिसती. तुझं बघ. तू शिकला तर तुला चांगली मिळेल”, असे अजित पवार म्हणताच सगळेच लोटपोट झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:37 27-09-2024