संगमेश्वर : कडवई-तुरळ रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचा आंदोलन करण्याचा इशारा

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कडवईची मासिक सभा सोमवारी दुपारी ११ वाजता ग्रामपंचायत हॉलमध्ये झाली. या ग्रामसभेत कडवई-तुरळ रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामाला आठ दिवसांत सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कडवई-तुरळ रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षी मंजुरी मिळाली होती. हा रस्ता रत्नागिरी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. कामाला १८ फेब्रुवारी २०२४ ला सुरुवात झाली. रस्ता तुरळ, कडवई, चिखली, तांबेडी ते कळंबस्ते असा असून, या कामासाठी २ कोटी ४४ लाख ४४ हजार ५२० रुपयांचा निधी मंजूर आहे. रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. बीबीएमच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा मे महिना संपत आला. काम सुरू झाले आणि पाऊस पडू लागला. यामुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडू लागले. कडवईत सुमारे सव्वाशे रिक्षाचालक आहेत. रिक्षा चालक, दुचाकी चालक यांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागते.

सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सूचना देऊनही रस्त्याच्या कामात चालढकल होत आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून वाहन चालकांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे येतात. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत रस्त्याच्या कामाबाबत चर्चा झाली असता आठ दिवसांत कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, माजी सरपंच वसंत उजगावकर व सर्व सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 17/Dec/2024