दापोली : उत्तरेकडील थंड वार्याच्या प्रवाहामुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम ‘मिनी महाबळेश्वर’ मानल्या जाणार्या दापोलीतही मोठ्या प्रमाणात जाणवला असून, दापोलीचे किमान तापमानाची नोंद 7.8 अंश इतकी नोंदवली गेली आहे.
दि. 14 डिसेंबरपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडत असून 14 डिसेंबर रोजी कमाल 32.5 अंश, तर किमान तापमान 10.8, 15 डिसेंबर रोजी 31.9 किमान 10.5, 16 रोजी कमाल 33.2, तर किमान 9.0 अंश सेल्सिअस, 17 रोजी कमाल 31.9, तर किमान 7.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलेे. तापमानातील या बदलामुळे दापोलीत सुरू झालेली थंडी काही काळ गायब झाली होती. आता पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे.
दि. 16 डिसेंबरपासून थंडीची पुन्हा सुरुवात झाली आहे. हवेत धुक्याची चादर आणि वाढत असलेला गारठा यामुळे लोकांना स्वेटर्स तसेच जर्कीन घालावे लागले. थंडीचा जोर वाढत आहे तर गुलाबी थंडीचा आनंद अनेकजण लुटत आहेत.
यापूर्वी दापोली येथे 2 जानेवारी 1991 मध्ये 3.4 अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविले गेले होते तर त्याच्या दुसर्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1991 रोजी ते 3.7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची नोंद झाली आहे. दि. 9 फेब्रुवारी 2019 या वर्षी 4.5 अंश इतके नीचांकी नोंदविले गेले होते.
आठवडाभर थंडीचे प्रमाण राहील. त्यानंतर मधेच उबदार वातावरण जाणवेल आणि पुन्हा थंडी सुरू होईल. हे वातावरण आंबा पीक यासाठी पोषक आहे. – डॉ. व्ही. जी मोरे, हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख , कोकण कृषी विद्यापीठ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 18-12-2024














