संगमेश्वर : आरवली येथील उड्डाणपुलाला भेगा

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर रस्त्याला भेगा पडल्याने वाहनचालकांकडून चिंता व्यक्त होत आहे.

आरवली येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून उड्डाणपुलापर्यंत रस्त्याची उंची वाढवण्यात आली आहे; परंतु हे बांधकाम निकृष्ट होत असल्याचे रस्त्याला पडलेल्या भेगांवरून दिसून येत आहे. यातील काही भेगा डांबराने बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उड्डाणपूल नवीन असल्यापासून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात पुलाखालील भाग पाण्याने वाहून गेला होता. त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने मातीचे भराव आणून टाकले होते.

एकूणच आरवली असो वा मुंबई-गोवा महामार्गाचे अन्य उड्डाणपूल असो, या उड्डाणपुलांच्या बांधकामावेळी प्रवासी हित कितपत जपले जात आहे, हे प्रश्नचिन्हच आहे. भेगा पडलेल्या या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दररोज ये-जा करत असतात; परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

आरवली उड्डाणपुलाच्या कामाचे स्ट्रकचरल ऑडिट करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 20/Dec/2024