चिपळूण : पुलाच्या कामामुळे कालुस्तेत गढूळ पाणी

चिपळूण : तालुक्यातील कोंढे करंबवणे मार्गावर सध्या खोपड-कालुस्ते पुलाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू आहे. मात्र पुलाचे काम करताना तेथील उपसा केलेले गढूळ पाणी थेट जवळच्या कालुस्ते खुर्द ग्रामपंचायतीच्या जॅकवेलमध्ये जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावात गढूळ पाणी नळाला येत आहे. यावरून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पुलाचे काम बंद पाडले. उपाययोजना केल्यानंतरच पुढील काम करण्याची तंबी देण्यात आली.

तालुक्याच्या खाडीपट्टा विभागात कोंढे-करंबवणे हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर कोंढे, शिरळ, खोपड, कालुस्ते, भिले, धामेली, केतकी, करंबवणेसह पुढे मालदोलीपर्यंत गावांतील वाहतूक होत असते. त्याबरोबर धामेली मार्गे कापरेपासून पुढे थेट दोणवली-ग्राग्रई गावापर्यंत हा रस्ता मार्ग जवळचा आहे. या मार्गावर असलेला खोपड-कालुस्ते पूल जुना झाल्याने आ. शेखर निकम यांनी अर्थसंकल्पातून कोटीहून अधिक निधी मिळवला. त्यास प्रशासकीय मान्यता घेतल्याने पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला.

सध्या या पुलाचे काम सबंधित ठेकेदाराकडून सुरू करण्यात आले आहे. येथील जुना पूल तोडून आता नव्याने उभारणी करताना पिलरसाठी खोदलेल्या खड्यातून पंपाच्या सहाय्याने पाणी उपसा केला जात आहे. पूर्णपणे गढूळ असलेले पाणी हे तेथेच सोडले जाते. हे पाणी तेथीलच ग्रामपंचायतीच्या जॅकवेलमध्ये जात आहे. या जॅकवेलमधून सुमारे २३०० लोकसंख्या असलेल्या कालुस्तेखुर्द गावाला पाणीपुरवठा केला जातो. पुलाचे काम सुरू झाल्यापासून गावातील नळांना गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना याबाबत माहिती दिली; मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पूल बांधकामावर धडक दिली.

माजी सरपंच अमीन परकार, रिझवान परकार, इब्राहीम परकार, मन्सूर परकार, समीर परकार, जफर परकार यांच्यासह ग्रामस्थांनी ठेकेदाराला गढूळ पाणी आणि जॅकवेलमध्ये गाळाचा आलेला थर, याबाबतचा जाब विचारला. त्यावर ठेकेदाराकडूनही उपाययोजना करून कामाला सुरवात करण्याचे आश्वासन देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 20/Dec/2024