रत्नागिरी : मुलांमध्ये श्वसनविकाराच्या रुग्णांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी वाढली

रत्नागिरी : थंडीचा कडाका वाढला असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. रत्नागिरी, चिपळूण या प्रमुख शहरांसह इतर ग्रामीण रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी येणाच्या मुलांमध्ये श्वसनविकाराच्या रुग्णांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी वाढली आहे. सर्दी, घशात खवखव, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे अशा समस्या मुलांना जाणवत आहेत.

जिल्ह्याच्या तापमानाचा पारा चांगलाच पसरला आहे. पहाटे, सायंकाळी आणि रात्री थंडीचा कड़ाका जाणवत आहे. दुपारी ऊन पडत असल्याने गारव्याचे प्रमाण कमी असते. वातावरणातील या बदलाचा फटका मुलांना बसत आहे. सध्या मुलांना श्वसनाचे विकार चळावले आहेत. २ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याच्या खालोखाल ९ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये ही समस्या जाणवत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

मुलांना सर्दी, घशात खबखब, खोकला, भूक मंदावणे, श्वास घ्यायला त्रास होणे, तोंडाद्वारे श्वास घेणे, नाकात जखम होणे, नाकातून रक्तस्राव होणे अशा समस्या जाणवत आहेत. मुलांना जाणवणाऱ्या श्वसनविकाराच्या समस्येने पालकांची मुलांवरील उपचारासाठी धावपळ उडत आहे.

मुलांना जाणवणाऱ्या श्वसनविकारांमुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. मुलांना नाक नीट साफ करता येत नसल्याने त्यांच्या नाकातील आतील भागामध्ये जखम होते. मुलांना ताप, जास्त प्रमाणातील खोकला, दम लागणे अशा समस्या जाणवत असतील तर तत्काळ उपचार घ्यावेत. – डॉ. गोकुळ देसाई

महामार्गावरील धुळीचाही त्रास
जिल्ह्यात सध्या मुंबई-गोवा महामार्ग तसेच मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी खोदाई सुरू आहे. यामुळे महामार्गावर तसेच लगतच्या परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे मुलांबरोबरच मोठ्यांनाही श्वसनाचे विकार जाणवत आहेत. वारंवार खोकला लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 20/Dec/2024