रत्नागिरी : वीजबिल थकल्याने महावितरणकडून राज्यातील तब्बल २५ हजारांवर शाळांचा गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठाच खंडित करण्यात आला होता. याबाबत वारंवार ओरड झाल्यानंतर अखेर राज्य शासनाने या शाळांसाठी ११ कोटी ११ लाख रुपयांचा निधी शिक्षण आयुक्तांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे या शाळांत पुन्हा प्रकाशाचे दिवे चमकणार आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्यातील २३८४ शाळांचा समावेश असून, त्यासाठी ३४ लाख निधी मंजूर करण्यात आला.
खेड्यापाड्यातील ६५ हजारांवर शाळांमध्ये वीजपुरवठ्याची मोठी समस्या आहे. विशेषतः १९ जिल्ह्यांमधील शाळांची थकबाकी प्रचंड वाढल्याने महावितरणने थेट शिक्षक संचालनालयाला जानेवारीतच सूचना दिली होती. त्यानंतर संचालनालयाने सर्व जिल्ह्यांकडून थकबाकीदार शाळांचा अहवाल गोळा करून महावितरणला आणि शासनाला दिला होता.
आता राज्य शासनाने हे बिल चुकते करण्यासाठी ११ कोटी ११ लाख रुपये शिक्षक आयुक्तांकडे सुपूर्द करण्यास मंजुरी दिली. त्यातून १६ जिल्ह्यांतील शाळांचे जुलैपर्यंतचे वीजबिल महावितरणकडे भरले जाणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षक संचालकांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
राज्यात पाच हजार शाळांचे मीटर काढले
जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल थकल्याने महावितरणकडून कठोर कारवाई करण्यात आली. यात राज्यातील २० हजार २१८ शाळांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. तर ४ हजार ९३९ शाळांमधील वीज मीटरच काढून टाकण्यात आले. आता शासन स्तरावरून बिलाचा भरणा होत असल्याने हे मीटर तातडीने बसवून देण्याची मागणी होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमध्येही तातडीने वीज मीटर बसवावेत, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:47 PM 20/Dec/2024














