डीपीए सीएमई २०२४ : रत्नागिरी येथे होणार मनोविकार तज्ञांची परिषद

रत्नागिरी : डेक्कन सायकियाट्रिक असोसिएशन (DPA) आणि रत्नागिरी असोसिअशन ऑफ मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डीपीए सीएमई २०२४’ या वार्षिक परीषदेचे आयोजन रत्नागिरीत हॉटेल सावंत पॅलेस येथे २१ व २२ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.

या वर्षीच्या कार्यक्रमाची थीम ‘रिचिंग द अनरीच्ड’ असून विशेष भागातील मानसिक आरोग्यविषयक सेवा व त्यांचे आव्हाने यावर केंद्रित आहे.

या सीएमईमध्ये विविध मानसिक आरोग्य विषयांवर ‘रिचिंग द अनरीच्ड’ या संदर्भात मान्यवर मनोविकारतज्ञांच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आत्महत्येच्या प्रकरणांवर आधारित मदत कशी करावी, स्क्रीन अॅडिक्शनचे व्यवस्थापन, गट-ब्रेन अॅक्सिस आणि मानसिक आरोग्य, गर्भावस्थेतील मानसिक आरोग्याचे निदान आणि उपचार, पोस्ट-कोविड मानसिक आरोग्याच्या आव्हानांचे व्यवस्थापन यासारख्या विविध विषयांचा समावेश आहे. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध मनोविकारतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ डॉ अतुल ढगे मानसिक आरोग्य पोहोचवण्यासाठी सोशल मेडीयाचा योग्य वापर या विषयी या परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यासोबतच प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ संघमित्रा फुले यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सीएमईमध्ये नामांकित मानसोपचारतज्ज्ञ व मान्यवर सहभागी होतील.

या दोन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मानसोपचारतज्ज्ञांनी नोंदणी केली आहे. सहभागी तज्ज्ञांना त्यांच्या क्षेत्रातील नवीन संशोधन व अनुभव शेअर करण्याची आणि मानसिक आरोग्याच्या सेवेसाठी नवीन मार्ग शोधण्याची संधी या मंचावर मिळेल. ज्या लोकांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा पोहचलेली नाही त्याचा उहापोह या मध्ये होईल व त्यासाठी काय मार्ग असू शकतो याविषयी चर्चा केली जाईल त्यामुळे ही परिषद मानसिक आरोग्य विषयक चर्चेला नवी दिशा देईल व मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा ठरेल.असा विश्वास आयोजक कार्यकारिणीचे सचिव डॉ. अतुल ढगे यांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. कृष्णा पेवकर (अध्यक्ष), डॉ. अतुल ढगे (सचिव), डॉ. श्रुतिका कोटकुंडे (उपाध्यक्ष), डॉ शाश्वत शेरे, डॉ मृण्मयी पेवेकर, स्वामिनी चव्हाण, विद्या मोहिरे आणि कार्यकारिणी समितीचे इतर सदस्य विशेष कष्ट घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:51 20-12-2024