चिपळूण : साधारणतः कोकणात शेतकरी केवळ शेतीवरच भर देतात. जमिनीची पोषकता, माकडे आणि गुरांचा त्रास आणि आतिवृष्टी, अतिउन्हाळ्यामुळे पालेभाज्या, फळेभाज्या पिकवणे जिकिरीचे असते. यासाठी त्या आयात केल्या जातात; पण कोकणातील गर्द झाडांनी नटलेल्या डोंगरदऱ्या पावसाळ्यात उपलब्ध पाणी आणि शेणखत, गांडूळखताचा योग्य वापर करून सुरक्षित शेती करता येते. यासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने आयआयटी मुंबईशी संधान बांधून फळभाज्या, वेलवर्गीय भाज्यांसाठी एक सुरक्षित बांबूचे घर अशी कल्पना करून बांबू पॉलीहाऊस बांधली आहेत.
कोकणात विपुल प्रमाणात बांबू प्रत्येक शेतकऱ्याकडे बांधावर किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ उपलब्ध आहेत. त्यांचाच वापर करून बांबूचे पॉलीहाऊस उभे केले आहे. त्याचा आकार अगदी आटोपशीर असल्यामुळे वापरण्यास अतिशय सुलभ. या हाऊसच्या चारही बाजूने हवा खेळती राहण्यासाठी शेडनेट लावली आहे. आपल्या मर्जीनुसार किंवा आतल्या पिकांच्या गरजेनुसार आपण ही शेडनेटची जागा पूर्ण बंद करू शकतो किंवा अर्धवट उघडी पण ठेवू शकतो. त्याचबरोबर पाण्यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली की, अगदी मर्यादित पाणी ज्यावेळी आपल्याला पाणी कमी उपलब्ध असणार आहे.
पावसाळ्यात कोकणात पालेभाज्या शेतामध्ये करता येत नाहीत. या बांबूच्या पॉलीहाऊसमध्ये कोथिंबीर, पालक, माठ अशा पालेभाज्या उत्तमरितीने आपण उत्पादित करू शकतो. याचे वैशिष्ट्य असे की, या हाऊसमधून निघणाऱ्या पालेभाज्या कोवळ्या आणि लुसलुशीत असतात. या हाऊसमध्ये झेंडू लागवड केलेली आहे. त्याच्या निरीक्षणानुसार वर्षभर आपल्याला झेंडूची फुले मिळू शकतात. हे हाऊस वापरात आणून फक्त सहाच महिने झाले. आता हिवाळी आणि उन्हाळी हंगामातसुद्धा काय काय त्यात करता येईल या विषयीचे प्रयोग सुरू आहेत.
तंत्रज्ञान, खर्च मुंबई आयआयटीने उचलला
छोटयाशा बांबूपासून केलेले पॉलीहाऊस कोकणातल्या छोट्या शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. पालेभाज्या आणि फळभाज्या त्यांना आपल्या अंगणातच पिकवता येणार आहेत. विशेष म्हणजे पॉलीहाऊस तंत्रज्ञान आणि येणारा खर्च हा आयआयटी मुंबईने उचलला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 20/Dec/2024













