शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील ‘महावाचन उत्सव’चे प्रशस्तीपत्र अचूक

मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात ‘महावाचन उत्सव २०२४’ राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रशस्तीपत्र देण्यात येते.

विभागाच्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर हे प्रशस्तीपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मान्य केलेले आणि विभागाने उपलब्ध करून दिलेले हे प्रशस्तीपत्र अचूक असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे.

महावाचन उत्सव २०२४ मधील सहभागाबाबत मिळणाऱ्या प्रशस्तीपत्रामध्ये चुका असल्याचे काही माध्यमांमधून दाखविण्यात येत आहे. हे प्रशस्तीपत्र खरे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महावाचन उत्सव २०२४ मध्ये सहभागी होण्याऱ्या विद्यार्थ्यांची माहिती वेब ॲप्लीकेशनमध्ये भरल्यानंतर शिक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्यानंतर ही माहिती शाळेच्या डॅश बोर्डवर दिसते. ही माहिती योग्य असल्यास डॅशबोर्ड वर जनरेट सर्टिफिकेट लिंकवर क्लिक केल्यानंतर यासाठी विकसित करण्यात आलेल्या https://mahavachanutsav.org या संकेतस्थळावर प्रशस्तीपत्र ऑनलाईन उपलब्ध होत असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.

बनावट प्रशस्तीपत्रामध्ये उल्लेख असलेल्या शाळेला याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 28-09-2024