देवरुख शहरातील पाणीपुरवठा रविवार, सोमवारी राहणार बंद

साडवली : देवरूख शहरातील पाणीपुरवठा लाईन (जलवाहिनी) ग्रामपंचायतकालीन असल्याने जुनी व अतिशय जीर्ण झाली आहे. त्यामुळे पाईपलाईन लिकेज झाल्यास पाणीपुरवठा करण्यात अडथळे येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्य जलवाहिनीला गळती लागली व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून युद्धपातळीवर पाणीपुरवठा लाईनची दुरुस्ती करण्यात आली; परंतु सदर पाईपलाईनचे बरेचसे काम अद्यापही शिल्लक आहे. त्यामुळे या लाईनवरील अनेक ठिकाणच्या नळकनेक्शन धारकांना पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी व पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी या गळती असलेल्या पाईपलाईनचे उर्वरित काम २२ व २३ डिसेंबर रोजी तांत्रिक व्यक्ती बोलावून नगरपंचायत करून घेणार आहे. त्यामुळे रविवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. या पाईपलाईनची गळती काढून पाणीपुरवठा लाईनचे काम पूर्ण होताच जास्त दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

तरी नागरिकांनी तांत्रिक अडचण समजून घेऊन देवरूख नगरपंचायत पाणीपुरवठा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन देवरूख नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:36 PM 20/Dec/2024