दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या ‘दिललुमिनाटी’ या टूर शोसाठी चांगलाच चर्चेत आहे. दिलजीत या टूरसाठी सध्या जगभरात फिरत आहे. सध्या दिलजीत या शोसाठी भारतात अनेक ठिकाणी त्याचे कॉन्सर्ट आयोजित करत आहे.
काहीच दिवसांपूर्वी या म्यूझिक कॉन्सर्टसाठी दिलजीत पुण्याला येऊन गेला. दिलजीतची मुंबईत नुकतीच कॉन्सर्ट झाली. या कॉन्सर्टआधी महाराष्ट्र सरकारने दिलजीतच्या शोसाठी सल्लागार समिती नेमल्याने दिलजीतने त्याची नाराजी व्यक्त केलीय.
दिलजीतने व्यक्त केली नाराजी
दिलजीतच्या एका फॅन पेजने त्याचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत दिलजीत म्हणतो की, “माझ्या टीमने मला काल सांगितलं की, आमच्या शोसाठी कोणतीही सल्लागार समिती नाहीये. सर्व ठीक आहे. आज सकाळी उठल्यावर कळलं की आमच्याविरुद्ध सरकारने सल्लागार समिती नेमली आहे. पण तुम्ही काळजी करु नका. तुम्ही जी मजा करायला येणार आहात, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मी तुम्हाला देईल.”
दिलजीत पुढे म्हणाला की, “आज सकाळी योग करताना चांगला विचार मनात आला. आजच्या शोची सुरुवात याच विचाराने करतो. जेव्हा सागर मंथन झालेलं तेव्हा अमृत होतं ते देवतांनी प्यायलं. परंतु विष जे होतं ते भगवान शंकराने प्राशन केलं. भोलेनाथने ते विष आपल्या आत घेऊन कंठात ठेवलं. म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात. मला यावरुन हेच शिकायला मिळलं की, आयुष्य असो किंवा आसपासचं जग तुमच्यावर कितीही विष फेकत असतील तरीही ते विष तुम्ही तुमच्या आत किती घेताय, हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी यातून हेच शिकलो.”
“तुम्ही तुमच्या कामात कधीही कमी पडू नका. लोक तुम्हाला अडवतील, रोखतील पण तुम्ही तुम्हाला जे वाटेल ते करा. मजा करा. कारण आज मी झुकणार नाही.” अशाप्रकारे दिलजीतने त्याची नाराजी व्यक्त केलीय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 20-12-2024