सोमेश्वर येथे विश्वमंगल गोशाळे मध्ये पशु वैद्यकीय शिबिर संपन्न

रत्नागिरी : सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी व जे एस. डब्ल्यू. फाउंडेशन आणि जेके ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वर येथे विश्वमंगल गोशाळे मध्ये मोफत पशु वैद्यकीय शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 20/ 12 /2024 रोजी करण्यात आले होते.

सदर पशुवैद्यकीय शिबिरामध्ये सोमेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. शिबीराच्या सुरुवातीला सोमेश्वर शांतीपीठ प्रकल्पाचे अध्यक्ष श्री राजेश आयरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सोमेश्वर शांतीपीठ मार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थित सर्वांना करून दिली. यामध्ये गोशाळा गोविज्ञान केंद्र, निसर्गोपचार व योगोपचार केंद्र त्याचप्रमाणे वनौषधी लागवड यासंदर्भातील माहिती प्रास्ताविकात त्यांनी दिली. श्री जयप्रकाश त्रिवेदी यांनी एस. डब्ल्यू. फाउंडेशन आणि जेके ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत दर महिन्याला राबवल्या जाणाऱ्या मोफत पशुवैद्यकीय शिबिराचा उद्देश उपस्थित शेतकरी बांधवांना सांगितला. पशुविषयक विविध उपक्रम या ट्रस्टमार्फत राबवले जातात याची माहिती दिली. यामध्ये गीर गाईच्या खरेदीसाठी अनुदान विविध गवताची बियाणे व पशुंच्या चिकित्सेसाठी दवाखान्याची निर्मिती या ट्रस्टचा मार्फत करण्याचे प्रयोजन त्यांनी व्यक्त केले. या शिबिरामध्ये डॉक्टर शिवप्रसाद गांगुलवार यांनी उपस्थितांना पशुपालनाच्या आजरासंदर्भात व लसीकरण संदर्भात घ्यावयाच्या काळजी विषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे उपस्थित शेतकऱ्यांना पशुना द्यावयाच्या खाद्य विषयीची माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांनी आणलेल्या गाई गुरांची तपासणी या वेळेला करण्यात आली. एस डब्ल्यू आणि जेके ट्रस्टचे रुलर डेव्हलपमेंट ऑफिसर श्री सिद्धेश औंधकर यांनी उपस्थित अशी संवाद साधला. त्याचप्रमाणे गावातील शेतकऱ्यांना संपर्क करून या शिबिरामध्ये उपस्थित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

सदर शिबिरामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या औषधांचे वाटप करण्यात आले. सोमेश्वर शांतीपीठ विश्व मंगल गोशाळेचे कार्यकर्ते श्री. पाटील सर ,सौ. अनुजा पेठकर , श्री राकेश वाघ, सौ छाया अनावकर, श्री नागवेकर श्री भातडे, श्री गंगाराम शर्मा असे कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 21-12-2024