रत्नागिरी : दोन वर्षांपूर्वी शहरानजीकच्या एमआयडीसी येथील स्नॅक्स सेंटरमध्ये आपण पोलिस असल्याची बतावणी करत जबरदस्तीने घुसून चार हजार रुपयांवर दोन सराईतांनी डल्ला मारला होता. या आरोपपिकी मुख्य आरोपीला न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड तर त्याच्या साथिदाराला २ वर्षे सश्रम कारावास आणि १ हजार रुपय दंडाची शिक्षा सुनावली.
मुख्य आरोपी शाहिद सादिक मुजावर (३२. रा. धनजीनाका बेलबाग, रत्नागिरी) आणि त्याचा साथीदार फुरकान यासिन फणसोपकर (३०, रा. कोकणनगर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात खुशबू जैपालसिंग वगेल (१७, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) हिने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास ती एमआयडीसी येथील आपल्या राहुल स्नॅक सेंटरमध्ये असताना दोन्ही आरोपी दुचाकी (एमएच-०८-एएस ४८९२) वरून तिथे आले. त्यातील फुरकानने तेथील एका गि-हाईकाला पत्ता विचारण्याचा बहाणा केला. ती संधी साधत शाहिदने दुकानात प्रवेश करुन फिर्यादी खुशबूला आम्ही पोलिस आहोत, अशी बतावणी करत तुम्ही या स्नॅक्स सेंटरमध्ये विमल गुटखा ठेवता म्हणून आम्ही तपासणी करायला आलो असल्याचे सांगितले.
याचदरम्यान जबरदस्तीने आतमध्ये घुसत त्याने फिर्यादीला धक्का दिला. त्यामुळे ती फ्रिजवर आदळली. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शाहिदने आपल्याकडील चाकू काढून ओरडलीस तुला मारेन, अशी धमकी देत स्नॅक्स सेंटरच्या गलल्यातील ४ हजार रुपये जबरदस्तीने घेउन आपल्या साथिदारासह दुचाकीवरुन पळून गेला होता.
या प्रकरणी फिर्यादी मुलीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३० सप्टेंबर २०२२ रोजी पेट्रोलिंग करताना ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना झाडगाव एमआयडीसी येथून अटक केली होती. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिरुध्द फणसेकर यांनी १० साक्षिदार तपासत युक्तिवाद केला. तो ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एस. गोसावी यांनी मुख्य आरोपी शाहिदला मुख्य आरोपीला न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड तर त्याच्या साथिदाराला २ वर्ष सश्रम कारावास आणि १ हजार रुपय दंडाची शिक्षा सुनावली.
दरम्यान, या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील आयरे आणि जिल्हा पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांनी काम पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 21/Dec/2024












