‘रनप’ने धोकादायक जुनी भाजी मार्केट इमारत पाडली

रत्नागिरी : रत्नागिरी बाजारपेठेतील धोकादायक बनलेल्या जुन्या भाजी मार्केटची इमारत रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाने पाडली. शुक्रवारी या भाजी मार्केट इमारतीचे पाडकाम करण्यात आले. रनपच्या मालकीची ही इमारत असून याठिकाणी ३ कोटी रुपये खर्चुन नवी भाजी मार्केटची इमारत उभारली जाणार आहे.

बाजारपेठेतील जुन्या भाजी मार्केटची इमारत १९७५ सालची असून ती पूर्णपणे खिळखिळी झाली होती. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेने येथील गाळेधारकांना मार्केट मोकळे करून देण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली. परंतु, गाळेधारकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पावसाळ्यात या इमारतीजवळ मोठा नोटीस बोर्ड लावून या मार्केटमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांना धोकादायक इमारती संदर्भात सूचित करण्यात आले. परंतु याकडेही गाळेधारकांनी दुर्लक्ष केले.

गाळेधारकांना पुन्हा नोटीस देवून मार्केटमधील गाळे मोकळे करून देण्यास सांगण्यात आले. या नोटीस विरूद्ध शंकर पोतदार, दत्ता कनगुटकर, राजाराम पवार या तीन गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. योग्यत्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याखेरीज भाजी मार्केट इमारतीतील दुकान गाळ्यांचा कब्जा रत्नागिरी नगर परिषदेने घेवू नये किंवा इमारत पाडू नये यासाठी आदेश करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. परंतु न्यायालयाने कोणतीही स्थगिती न दिल्याने शुक्रवारी रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाने मोडकळीस आलेली ही इमारत पाडण्यास सुरूवात केली.

रत्नागिरी नगर परिषदेच्या पथकाने जेसीबी आणि कामगारांच्या मदतीने पाडकाम सुरू केले. हे काम सुरू असतानाच गाळेधारकांनी भाजीसह आपल्या इतर वस्तू हलवल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 21/Dec/2024