चिपळूणच्या पवन तलाव मैदानावर रात्रीच्यावेळी गैरप्रकार

चिपळूण : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चिपळूण नगर परिषद मालकीच्या पवन तलाव मैदानावर रात्रीच्यावेळी गैरप्रकार होत आहेत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीद्वारे संपूर्ण मैदान संरक्षक भितीने बंदिस्त केले आहे. तर मैदानात जाण्यासाठी एकमेव असलेले मुख्य प्रवेशद्वार लोखंडी दरवाजा लावून कुलूपबंद ठेवले. एवढे करुनही या मैदानातील गैरप्रकार थांबले नाहीत. कारण या गेटजवळच्या छोटा दरवाज्यातून अनेक तरूण रात्रीच्या वेळी पवन तलाव मैदानात प्रवेश करीत असून तेथे ‘रात्रीस खेळ’ जोरात सुरू आहे.

शहरात मध्यवर्ती भागात एकमेव असलेले पवन तलाव मैदान शहरातील खेळाडूंना सोयीस्कर ठरत आहे. त्याचबरोबर पहाटेच्यावेळी ज्येष्ठ नागरिकांना या मैदानावर चालण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत या मैदानावर शहरातील शालेय विद्यार्थ्यांपासून तरूणांपर्यंत विविध खेळांचा सराव करीत असतात. मध्यवर्ती भागात विस्तीर्ण मैदान असल्यामुळे अनेक खेळांचा सराव एकाचवेळी सुरू असतात. तसेच विविध स्पर्धांसाठी हे मैदान उपयुक्त ठरले आहे. मैदानावर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी देखील खासगी वाहन चालक वापर करीत असल्याचे दिसून आले होते. परिणामी, मैदानाची सर्व दृष्टीने दुरवस्था झाली. मात्र, रात्री छोट्या दरवाज्यातून अनेकजण आत शिरतात. त्यामध्ये प्रामुख्याने तरूणांची टोळकी या ठिकाणी मद्यप्राशनासह नशेच्या आहारी जाणारे मादक पदार्थाचे सेवन करताना निदर्शनास आले आहेत.

मद्य प्राशन करणारी तरूणांची टोळकी या मैदानावर मद्याच्या बाटल्या फोडून निघून जात असल्याचे उघड झाले आहे. या बाबत नागरिकांसह खेळाडूंनी न.प. कडे व लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्यानंतर अखेर या मैदानाचा विकास करण्याकरिता आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मैदान बंदिस्त करून ते चांगल्या दर्जाच्या मैदानाचा विकास करण्यासाठी आराखडा करण्यात आला. त्यानुसार काही कोटी रूपये या मैदानाच्या विकास व संरक्षणासाठी उपलब्ध झाले. त्यातून मैदान आराखड्याप्रमाणे काही प्रमाणात विकसीत झाले तर संपूर्ण मैदानाला उंच संरक्षक भिंत उभारण्यात आली. मुख्य प्रवेशद्वाराजवळ मजबूत लोखंडी जाळीचा दरवाजा व त्या शेजारी छोटा दरवाजा लावण्यात आला. सध्या याच मैदानावर क्रिकेटच्या चार खेळपट्ट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच नव्याने स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाचा देखील गैरवापर होऊ लागला आहे. मैदानातील गैरप्रकाराना आळा घालण्यासाठी असे नियोजन झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वारातील लोखंडी दरवाजा बंदिस्त असून शेजारील छोटा दरवाजा सताड उघडा असून तरूणांची टोळकी मैदानात शिरकाव करत आहेत.

न.प.चा मालमत्ता विभाग निद्रिस्त…
न.प.च्या माध्यमातून कायमस्वरूपी देखभाल व निगा राखण्यासाठी प्रशासनाकडून ठेकेदारी तत्त्वावर कर्मचारी नेमले जातात. मात्र, यात देखील घोळ असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे. न.प. मालकीच्या मालमत्तांची देखभाल व सुरक्षा आणि संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी स्वतंत्र मालमत्ता विभाग आणि अधिकारी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत न.प.च्या मैदानासहीत इमारती असलेल्या मालमत्तांबाबत या विभागाकडून बेफिकीर आणि उदासीन धोरण दाखविले जात आहे. वेळच्यावेळी स्वच्छता, दुरूस्ती व सुरक्षा या बाबत या विभागाकडून कायमस्वरूपी नियोजन सुरू ठेवणे गरजेचे असताना देखील नागरिकांमधून ज्या वेळेस तक्रारी येतात. त्यावेळी केवळ नियोजनाचा दिखावा केला जातो. एकूणच न.प.चा मालमत्ता विभाग आणि संबंधितांकडून न.प. मालकीच्या मालमत्तेची योग्यप्रकारे देखभाल व सुरक्षा गंभीरपणे होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 21/Dec/2024