◼️ आमदार भास्कर जाधव यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी
गुहागर : शहरातील उच्च महाविद्यालयातील ४ प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचा विषय थेट महाराष्ट्राच्या विधान भवनात मांडण्यात आला. औचित्याच्या मुद्द्याद्वारे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. याच दरम्यान १७ डिसेंबरला सकाळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश भोसले, सचिव संदीप भोसले, रोहन भोसले आणि अन्य ४ ते ५ जणांनी प्रा. हिरगोंड, प्रा. भालेराव, प्रा. सानप आणि प्रा. जाधव यांना मारहाण केली. ही मारहाण झाल्यानंतर गुहागर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांकडून तक्रार नोंदवण्यास विलंब सुरू होता. या दरम्यान मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालय शिक्षक आणि विद्यार्थी संघटनेचे (बुक्टू) अध्यक्ष गुलाबराव
राजे आणि सचिव चंद्रशेखर कुलकर्णी यांनी आमदार भास्कर जाधव यांना पत्र पाठवले. याच पत्राचा आधार घेत शुक्रवारी आमदार जाधव यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा म्हणून प्राध्यापकांच्या मारहाणीचा मुद्दा सभागृहात मांडला. तसेच गुहागरमधील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात सुरू असणारे गैरव्यवहार उघड करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्याची मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 21-12-2024












