रत्नागिरी : देशसेवा बजावणारा सैनिक शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे सगळं दिलं जाते. त्यांना जर सर्व मिळते मग बाकीच्यांना का दिले जात नाही? अशी अतिशय संकुचित मते मांडणाऱ्यांनी ईर्ष्या करण्यापेक्षा स्वतःच्या मुलांना सैन्यात भरती करावे. सैन्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुलांचे पालक होऊन बघा, असे परखड मत सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केले.
सियाचीन येथील सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करणाऱ्या चिथडे यांचे व्याख्यान उर्मी ग्रुपतर्फे आयोजित केले होते. ”राष्ट्राय स्वाहा, इदं न मम्” या विषयावर बोलताना सुमेधाताईंनी सियाचीनमधील सर्वोच्च उंचीवर देशसेवा बजावणाऱ्या सैनिकांसाठीची ऑक्सिजनची गरज ओळखून भारतीय हवाईदलातून निवृत्त झालेले पती योगेश चिथडे यांच्या मदतीने ऑक्सिजन जनरेशन प्लान्टची कशी उभारणी केली तसेच ”सिर्फ फाउंडेशन”च्या माध्यमातून सैनिकांसाठी केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी दिली. या वेळी सैनिकांच्या विविध कामाच्या ध्वनीचित्रफिती सादर केल्या. सैनिकांप्रती आपण कृतज्ञ असणं गरजेचं आहे, असं सांगत ”सिर्फ”च्या (सोल्जर्स इंडेपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन) माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटरचं काम कसं चालते, हे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे समजावून दिले. कारगिल युद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांची यशोगाथा त्यांनी उलगडून दाखवली. स्वतःची दुःखं किती कुरवाळत बसतो आणि सैनिक किती प्रतिकूल परिस्थितीत काम करतात यांच्या ध्वनिचित्रफिती पाहताना प्रेक्षागृह सुन्न झाला होता. सैनिकांच्या मदतीसाठी देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
श्रोत्यांना अंतर्मुख
लग्नसमारंभ सध्या ‘इव्हेंट’ म्हणून साजरे केले जातात. त्यावर लाखो रुपये खर्च होतात; पण सैनिकांसाठी काही करण्याची वेळ आली की, हात मागे पडतो, असे सांगत सुमेधाताईंनी श्रोत्यांना अंतर्मुख केले. दोन तास चाललेल्या या व्याख्यानात उपस्थित रत्नागिरीकर मंतरलेल्याप्रमाणे बसून होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 21-12-2024












