आगामी काळात मागेल त्याला पदवी!

रत्नागिरी : अंगभूत कौशल्ये असूनही यांच्या पदवीपासून दूर राहणाऱ्यांना उच्च शिक्षणाच्या छताखाली आणण्यासाठी पदवी प्रवेश शिक्षणाची चौकट विद्यापीठ आयोगाने शिथील केली आहे. एखाद्या शाखेतील किंवा विषयातील पदवी मिळवण्यासाठी औपचारिक पात्रतेचे निकष मोडीत काढून त्या विषयातील कौशल्ये, अनौपचारिक शिक्षण, एखाद्या क्षेत्रातील अनुभव मूल्यमापनाच्या आधारे पदवी देण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आगामी काळात होणार असल्याने मागेल त्याला पदवी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेकदा उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही कामाची गरज व परिस्थिती, कामाची निकड यामुळे पदवी मिळवण्यात अडचण येत होती. मात्र आता ती अडचण दूर झाली आहे. एखाद्या शाखेतील किंवा विषयातील पदवी मिळवण्यासाठी आवश्यक औपचारिक पात्रतेचे निकष मोडीत काढून मागेल त्याला पदवी अशी लवचिकता उच्च शिक्षणात येत्या काळात येणार आहे.

कौशल्ये, अनौपचारिक शिक्षण, एखाद्या क्षेत्रातील कामाचा अनुभव यांच्या आधारेही पदवी प्रदान करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. त्याचा पूर्वप्रमाणिकरण आराखडाही युजीसीने प्रसिध्द केला आहे. त्यानुसार येत्या काळात कामाचा अनुभव, आत्मसात केलेले कौशल्य, स्व अध्ययनाच्या माध्यमातून एखाद्या विषयाचे शिक्षण, एखाद्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील अनौपचारिक शिक्षण, गुरुशिवाय परंपरेनुसार शिक्षण यांच्या आधारे पदवी मिळण्याची मागणी विद्यार्थी करू शकतील.

यूजीसीने यापूर्वी प्रसिध्द केलेले अध्ययन निष्पत्तीचे निकष व पदवीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामाचा अनुभव, कौशल्ये यांचा ताळमेळ बसत असल्यास अशा विद्यार्थ्याला पदवी देण्यात येणार आहे.

कशी असेल प्रक्रिया…
या पदवी प्रक्रियेत विद्यार्थी करत असलेल्या कामाचे स्वरुप, अनुभवाचे मूल्यांकन, कौशल्य, सद्यस्थितीत लागू असलेला अभ्यासक्रम या आधारे व देण्यासाठी स्वतंत्र समिती नेमून तिच्याव्दारे निर्णय घेण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे पदवीइतके श्रेयांक नसल्यास पदवी अभ्यासक्रमातील काही विषयांत सवलत दिली जाईल. मात्र, सध्याच्या शिक्षण पध्दतीमध्ये पदवीसाठी किमान बारावी उत्तीर्ण ही पात्रता असली तरी यूजीसीच्या निर्णय शिथिलता धोरणानुसार हीच शैक्षणिक पात्रता कायम राहील का वेगळी असेल याबाबत संधिग्धता आहे.

नवीन शैक्षणिक वर्षात अंमलबजावणी…
कौशल्ये व अनुभवाच्या बळावर पदवी मिळवण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून अर्ज करता येणार आहे. एखाद्या दुकानदाराला कामाचा अनेक वर्षांचा अनुभव असेल तर त्याला व्यवस्थापन शाखेची पदवी, पदव्युत्तर पदवीसाठी अर्ज करता येईल. कामाच्या अनुभवाच्या जोरावर परिचारिकेला परिचर्या तर मूर्तिकाराला कला क्षेत्रातील पदवी मिळू शकणार आहे. याशिवाय अनुभव कौशल्यासह आवश्यक काही मोजक्याच विषयांची परीक्षा देऊनही पदवी मिळवता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 24/Dec/2024