‘भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर झालेली निवड’ : सुनील तटकरे

मुंबई : राज्यात महायुतीचे तर केंद्रात एनडीएचे सरकार आहे. केंद्राच्या सरकारमध्ये अजितदादा गटातील एकही खासदाराला मंत्रिपद मिळालेले नाही. तशातच राज्यातील महायुती सरकारमध्येही भाजपा अजितदादा गटाला कमी महत्त्व देत असल्याची टीका विरोधक सातत्याने करत आहेत.

या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सणसणीत उत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड झाली. त्यानंतर आज सुनिल तटकरे प्रदेश कार्यालयात आले असता त्यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्व कमी झाल्याच्या कपोलकल्पित बातम्या गेले काही दिवस आमच्या हितचिंतकांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजप आपल्या मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वागणूक देतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी केंद्रीय समिती अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. मला जी समिती दिली आहे त्या समितीची जबाबदारी फार मोठी आहे. त्या समितीच्या कामकाजाबद्दल आता सांगणे योग्य नाही. कारण ही समिती लोकसभेच्या अखत्यारीत येते. मात्र या समितीचे काम योग्यरितीने करण्याचे सातत्य माझ्याकडून ठेवले जाईल,” असे सुनिल तटकरे म्हणाले.

“राज्यात जी विविध महामंडळे आहेत, त्यावर योग्य ती कार्यवाही सुरू आहे. निवड करण्यास विलंब झाला असला तरी काही दिवसातच माझ्या महत्वाच्या सहकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल असा मला विश्वास आहे,” असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

सुनील तटकरे देशाच्या महत्वाच्या समिती अध्यक्षपदी, रायगडमध्ये जल्लोष

देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दर वार्षिक ३ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असलेल्या समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली आहे. सुनील तटकरे यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्राच्या वाट्याला महत्वाच्या समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण ३१ खासदारांचा या समितीमध्ये समावेश आहे. या समितीचे नेतृत्व आता सुनील तटकरे करणार असून, देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि जास्त मागणी असलेल्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राबद्दल अनेक महत्वाचे निर्णय या समितीकडून घेण्यात येतात. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार तटकरे यांची निवड झाल्याने रायगडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषही केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 28-09-2024