चिपळूण : मिशन बंधारा मोहिमेंतर्गत कान्हेमध्ये लोकसहभागातून बांधले पाच वनराई बंधारे

चिपळूण : तालुक्यातील कान्हे येथे मिशन बंधारा मोहिमेंतर्गत वनराई व विजय बंधारे बांधण्यात आले. ग्रामपंचायत कान्हे व राष्ट्रीय सेवा योजना आयटीआयच्या सहकार्याने ३० मीटर लांबीचे बंधारे उभारण्यात आले. या बंधाऱ्यांमध्ये चांगला पाणीसाठा झाला असून, तो परिसरातील शेती व जनावरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाई भासू नये तसेच पऱ्या नदीतून वाया जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरावे. जमिनीतील पाणीपातळी वाढावी त्याचबरोबर पावसाळा संपल्यानंतर शेतीला तसेच जनावरांना पाण्याचा उपयोग होण्यासाठी पंचायत समितीने मिशन बंधारे मोहीम हाती घेतली.

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना वनराई तसेच विजय व कच्चे बंधारे उभारण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्यातील कान्हे ग्रामपंचायतीने लोकसह‌भागातून ५ वनराई व विजय बंधारे उभारले. यासाठी चिपळूण आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी मोलाची मदत केली. ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनास बचत गटाच्या महिलांनी प्रतिसाद दिला. विस्तार अधिकारी मिलिंद केळसकर, एकात्मिक बालविकास योजनेच्या नायकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे बंधारे उभारण्यात आले. मजबूत बंधारे उभारण्यासाठी आयटीआयमधील कडवईकर, भुवड, नासरे, गटनिदेशक गोरे, कार्यक्रम अधिकारी पाणिंद्रे. सरपंच वैष्णवी ताम्हणकर, उपसरपंच नीता जठार, ग्रामपंचायत अधिकारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष, महिला बचतगट प्रतिनिधी, ग्रामसंघ कार्यकारिणी, सीआरपी, अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामस्थांनी श्रमदान करून योगदान दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 25/Dec/2024