चिपळूण : शहरातील नागरिकांनी वाढीव घरपट्टीसंदर्भात केलेल्या तक्रारींच्या निर्णयाबाबत चिपळूण न.प.त आलेल्या अर्जदार हरकतींसाठी आज (दि. २६) रोजी नगर परिषद प्रशासनाने संबंधित नागरिकांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी १० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात होणार आहे. यावेळी सुनावणी दरम्यान आलेल्या हरकतींचा पुनर्विचार केला जाणार आहे.
चतुर्थ वार्षिक कर आकारणी अंतर्गत न.प. प्रशासनाकडून बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर शहरातील मालमत्ता धारकांचे पुनः सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार व्यापाऱ्यांसह रहिवास सदनिका इमारती, खासगी रहिवास इमारतींची पुनः सर्वेक्षणांतर्गत मोजणी करण्यात आली. त्यामध्ये न.प. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सुमारे १८ हजार सदनिका धारकांची घरपट्टी वाढली. त्यामध्ये काहींनी बांधकाम करूनही त्याचे न.प.ला कळविले नव्हते तर काहींनी अंतर्गत वाढीव बांधकाम केले होते. काहींच्या इमारतीमधील सदनिकेत भाडेकरू ठेवण्यात आले होते. तसेच न.प.ने सोयीसुविधांनुसार झोन बदल केल्याने अशा अनेकांच्या घरपट्टी करात वाढ झाली. मात्र प्रत्यक्षात नागरिकांनी या बाबींची माहिती घेत नव्याने आकारण्यात आलेली घरपट्टी चुकीची असल्याबाबत हरकती घेत तक्रारी केल्या. त्यातून नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर विविध पक्षांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या विषयात लक्ष घातले.
अखेर न.प. प्रशासनाने या संदर्भात नागरिकांना हरकती घेण्यास मुदत देण्यात आली. त्यानुसार २८ डिसेंबरपर्यंत संबंधितांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील आलेल्या हरकती व तक्रारींवर २६ रोजी सकाळी १० वा. पासून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये संबंधित नागरिकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.
तर उर्वरित सुनावणी २८ डिसेंबरनंतर होणार आहे. दरम्यान, बहुतांश हरकत घेणाऱ्या तक्रारदारांचे पुनः सर्वेक्षण करण्याच काम सुरू झाले आहे. ज्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा संबंधितांची सुनावणी पहिल्या टप्प्यात होणार आहे.
पुनः सर्वेक्षणामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे प्राथमिक निरसन झाल्याचे सांगितले जाते. या सर्वेक्षणात काही चुका असल्याचेही प्रशासनाकडून संबंधित नागरिकांना कबूल केल्याचे सांगितले जात असून तक्रारदार नागरिकांनी देखील पुन्हा सर्वेक्षणासाठी आलेल्या न.प. कर्मचाऱ्यांकडे काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
खासगी कंपनीकडून सर्वेक्षणात त्रुटी…
नव्याने मालमत्ता कर आकारणीसाठी प्रशासनाने केलेले पुनः सर्वेक्षण हे सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे दोन ते अडीच कोटी रूपये खर्च करून खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात अनेक चुका निदर्शनास आल्या आहेत. काही ठिकाणी घर पूर्ण झाल्याच्या तारखांमध्ये जुना-नवा असा घोळ आहे. काही ठिकाणी बांधकाम अपुरे असताना देखील त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यासारखे त्याची मोजणी करून आकारणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी कोणतेही बदल नसताना चुकीच्या नोंदीमुळे दुप्पट ते तिप्पट घरपट्टी कर आकारला गेला आहे. तसेच काही ठिकाणी घर क्रमांकाची अदलाबदल झाली असून त्यामुळे घरपट्टी वेगवेगळी आली आहे. अशाप्रकारे अडीच कोटींचा चुना लावून या कंपनीने सदोष काम केल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसत असून या कंपनीकडून भरपाई घ्यावी, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 26-12-2024














